कैद्यांच्या भेटीसाठी 500 रुपये, जळगाव येथील कारागृहातील धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:53 PM2018-01-05T12:53:39+5:302018-01-05T12:56:29+5:30
सहा महिन्यात सहा जण निलंबित
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 05- कारागृहातील कैद्यांना ठरवूनदिलेल्या वेळेनंतर बाहेरुन खिडकीद्वारे भेटायचे असेल तर 100 रुपये व आतमध्ये जावून भेट घ्यावयाची असेल तर 500 रुपये मोजावे लागतात, याशिवाय दवाखान्याचे कारण सांगून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठीही एका दिवसाचे 3 ते 5 हजार रुपये आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कैद्यांशी लागेबांधे ठेवून त्यांचे नातेवाईक व मित्रांच्या भेटी घालून देणे, अनधिकृतपणे जेवणाच्या डब्यासह अन्य वस्तू पुरविणे यासह अन्य कारनामे केल्याने कारागृहातील सुभेदार पंडित बाळू बोरसे, रक्षक सूर्यभान एकनाथ पवार, साहेबराव भाईदास चव्हाण व विजय कोडाजी सोडस या चार जणांवर सोमवारी निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर कारागृहातील अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. दरम्यान सुभेदार बोरसे व चव्हाण यांना पैठण तर पवरी लातूर व विजय सोडस यांना निलंबन काळात धुळे येथेनियुक्ती देण्यात आली आहे.
अधीक्षकाच्या निलंबनानंतरही नाही घेतला धडा
मे 2016 मध्ये कारागृहाचे अधीक्षक डी.टी.डाबेराव व रक्षक आमले हे दोघं जण निलंबित झाले होते. दवाखान्यात दाखल करण्यासाठी कैद्याच्या नातेवाईकाकडून दोन हजार रुपयाची लाच घेताना दोघांना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कु:हाड कोसळली. इतकी मोठी घटना घडल्यानंतरही कारागृहातील अधिकारी व कर्मचा:यांनी धडा घेतला नाही, उलट हा प्रकार जास्त प्रमाणात सुरु झाला.आता सहा महिन्यात सहा जण निलंबित झाले आहेत.
सहा महिन्यापासून अधीक्षकच नाही
डाबेराव यांच्यावर कारवाई झाल्यानंतर येथे नव्याने अधीक्षक नेमण्यात आलेला नाही. वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनील कुवर यांच्याकडे प्रभारी पदभार आहे. कुंवर हे नाशिक येथून बदलून आले आहेत. तेथेही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. कुख्यात गुन्हेगारांजवळ मोबाईल आढळून आल्याचे प्रकरण कुंवर यांच्या अंगाशी आले होते. सध्या त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. या कारवाईमुळे त्यांना जळगावला नियुक्ती देण्यात आली.
अनेक कर्मचारी गुंतले.. कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करणे, अनाधिकृतपणे कैद्यांच्या भेटी घेऊ देणे, खुनाच्या गुनतील कैद्यांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबविणे, सुरक्षा व्यवस्था धोक्यात आणणे, प्रभारी कारागृह अधीक्षकांच्या गैरहजेरीत नियमावलीचे पालन न करणे, कैद्यांशी संबंध ठेवणे यासह अन्य गंभीर ठपके निलंबित कर्मचा:यांवर ठेवण्यात आले आहेत. हे प्रकार त्यांच्याच बाबतीत आहेत असे नाही,अनेक दिवसापासून हे प्रकार सुरु असून त्यात काही कर्मचारी गुंतलेले असल्याचा आरोप होत आहे.