ज्ञान वाटणाऱ्या ५०० शाळा अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:15 AM2021-02-12T04:15:42+5:302021-02-12T04:15:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देताना ५०० शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात आल्याची व आणखी बांधण्यात येणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देताना ५०० शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात आल्याची व आणखी बांधण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक येथे बैठकीत दिली. मात्र, जिल्ह्यातील सुमारे ५०० शाळांमध्ये अद्यापही वीजमीटर पोहोचलेले नाही, असे असताना संरक्षक भिंतीना प्राधान्य का? विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न काय?. शिक्षण विभागाचा प्राधान्यक्रम चुकतोय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जिल्ह्यातील सर्व शाळा संरक्षित होण्यावर सध्या जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाचा कल अधिक दिसत आहे. या संरक्षक भिंतीची कामे रोजगार हमी योजना व वित्त आयोगाच्या निधीतून पूर्ण करायची आहे. लॉकडाऊनच्या काळातही अनेक शाळांच्या संरक्षक भिंतीची कामे सुरू होती. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील ५८६ शाळांना वीजमीटर नाही, ५ नोव्हेंबर २०११ रोजीची ही माहिती आहे. यानंतर काही शाळांना वीज मीटर बसविले असतील असे सांगण्यात येत आहे.
बिकट परिस्थिती
एकूण शाळा : १८२७
शाळांना वीज मीटर नाहीत: ५८६
मीटर असूनही वीजपुरवठा खंडित असलेल्या शाळा : ६४२
थकलेले एकूण वीजबिल : ६० लाख ४७ हजार ८८६ रुपये
आणि विकासकामे
५०० शाळांना संरक्षक भिंतीचे काम झाले
उर्वरीत १३ शाळांनाही संरक्षक भिंत बांधण्यात येईल
सभांमध्येही गाजतात केवळ भिंती
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्येही संरक्षक भिंतीचाच विषय गाजतो. या बैठकीतही हाच विषय गाजला होता. आमच्या गटातील शाळा का सोडल्या, आम्हाला कल्पना का दिली नाही, असा सदस्यांचा प्रश्न असतो. मात्र, शाळेत प्रयोगशाळा आहे का, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी आहे का, शाळा डिजिटल आहे का, वीज आहे का? या मुद्यांवर चर्चा होताना दिसत नाही.
कोट
थकीत वीजबिले, विद्युत पुरवठ्याची माहिती शासनाकडे सादर केलेली आहे. अनेक शाळांवर सोलर यंत्रणा आपण बसविली आहे. ग्रामपंचायतीने वित्त आयोगातून शिक्षणावर खर्च करण्याचे नमूद आहे.
- भाऊसाहेब अकलाडे, शिक्षणाधिकारी