जळगाव तालुक्यात मृत्यू ५०२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:17 AM2021-04-07T04:17:08+5:302021-04-07T04:17:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ३ व ग्रामीणमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाल्याने जळगाव तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील ३ व ग्रामीणमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाल्याने जळगाव तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५०२ वर पोहोचली आहे. यात जळगाव शहरात ४०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत मृत्यू होत असल्याचे गंभीर चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जळगाव शहरात ३३३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असून ११७६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ११२१ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. मृत्यू रोखणे यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यात मंगळवारी शहरातील एका ३३ वर्षीय तरूणासह ६० व ६६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. यासह भुसावळ, बोदवड, चोपडा येथे प्रत्येकी २ तर चोपडा, जळगाव ग्रामीण, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, जामनेर या तालुक्यात प्रत्येकी १ बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजेअभावी विलंब
मोहाडी रुग्णालयात शंभर बेडची ऑक्सिजन सिस्टीम कार्यरत करण्यात आली आहे. आता या ठिकाणी वीज नसल्याने अखेर मंगळवारीही रुग्ण दाखल करता आले नाही. बुधवारी दुपारपर्यंत हे काम झाल्यानंतर रुग्ण दाखल करण्यात येतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.