५२१ पाणी नमुन्यात आढळले नायट्रेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2017 11:52 PM2017-03-09T23:52:10+5:302017-03-09T23:52:10+5:30
धोकादायक : १८ ठिकाणी फ्लोराईडचे प्रमाण, मानवी हस्तक्षेपामुळे होतेय वाढ
जळगाव : जलस्त्रोतांजवळ अस्वच्छता व रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. कोणत्याही प्रक्रियेद्वारे ते नष्ट होऊ शकत नसल्याने हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १८ पाणी नमुन्यांमध्ये फ्लोराईडचेही प्रमाण आढळून आले आहे.
वरिष्ठ भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. यामध्ये उन्हाळा, पावसाळा अशा वेगवेगळ््या ऋतूमध्ये पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी जास्त होत असते. मात्र यात धोक्याची घंटा आहे ती नायट्रेटच्या प्रमाणाची.
मानवी हस्तक्षेप वाढला
पाण्यामध्ये इतर घटकांचे प्रमाण कमी जास्त होते ते नैसर्गिक कारणांमुळे. मात्र नायट्रेट हे नैसर्गिकरीत्या पाण्यात वाढू शकत नाही. याला मुख्य कारण आहे मानवी हस्ताक्षेपाचे. पाण्याच्या स्त्रोताजवळ हस्तक्षेप वाढल्याने अस्वच्छता वाढते व नायट्रेटचे प्रमाण वाढते.
फ्लोराईडचे १८ नमुने
४जिल्ह्यात १८ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये फ्लोराईडचेही प्रमाण आढळून आहे. पाण्यामध्ये १.५ मिलीग्रॅम प्रतिलीटर एवढे प्रमाण स्वीकार्य आहे. मात्र या १८ ठिकाणी यापेक्षा जास्त प्रमाण आढळून आले आहे. जळगाव शहरात मात्र हे प्रमाण वाढलेले नाही.
फ्लोराईडचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास दातांचे व हाडांचे विकार होतात.
रक्ताभिसरणाचे आजार
नायट्रेटचे प्रमाण वाढल्यास ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही तसेच रक्ताभिसरणाचे आजार वाढतात.
धोका टाळण्यासाठी तपासणी करा
जळगाव येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाच्यावतीने जिल्हाभरातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत असून यासाठी जिल्ह्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी कार्यालयात आणावे.
अस्वच्छतेमुळे नायट्रेटचे वाढते प्रमाण
पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढते ते अस्वच्छता व रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे. जिल्ह्यातील तब्बल ५२१ पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींजवळ शेणाचे खड्डे करणे, कपडे धुणे, सांडपाणी सोडणे असे अस्वच्छतेचे कारणे आहेत. यात सर्वात धोकेदायक ठरतात ते शेणाचे खड्डे. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात शेण हे विहिंरीजवळ टाकले जाते.
कोणत्याही प्रक्रियेने नायट्रेट निघत नाही
पाण्यातील सर्व घटक शुद्धीकरण व इतर प्रक्रियेद्वारे निघू शकतात. मात्र नायट्रेट हे शासकीय जलशुद्धीकरण यंत्रणा असो वा घरगुती आरओ असो, या कशामुळे नायट्रेट नष्ट होऊ शकत नाही आणि त्याचेच प्रमाण पाण्यामध्ये जास्त आहे.
पाण्यात आढळून आलेले घटक
जिल्ह्यात ५०२३ पाण्याचे नमुने घेण्यात येतात. यातील १५७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २० ठिकाणी विद्राव्य क्षार (टीडीएस), ५२१ ठिकाणी नायट्रेट, १११ ठिकाणी आयर्न, १८ ठिकाणी फ्लोराईड, २९ ठिकाणी आम्लता (अल्कलीन), २८ ठिकाणी पीच आणि एका ठिकाणी गढूळपणा (टर्बिनिटी) आढळून आले.
५२१ ठिकाणी धोक्याच्या पातळीवर
पाण्यामध्ये कोणते घटक किती पर्यंत असावे याची एक स्वीकार्य मर्यादा असते. मात्र नायट्रेटच्या बाबतीत तसे नाही. त्याचे थोडेही प्रमाण स्वीकार्य नसते. असे असताना जिल्ह्यातील ५२१ पाणी नमुन्यांमध्ये प्रति लीटर ४५ मिलीग्रॅमच्यावर नायट्रेट आढळून आले आहे.