शहरातील ५३ रुग्णालयांकडे अग्निशमनची एनओसीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:50+5:302021-01-15T04:13:50+5:30
फायर ब्रिगेड एनओसी असलेले रुग्णालये - २५६ नोंदणी असलेले रुग्णालये - ३०९ प्रमाणपत्र नसलेले रुग्णालये - ५३ लोकमत ...
फायर ब्रिगेड एनओसी असलेले रुग्णालये - २५६
नोंदणी असलेले रुग्णालये - ३०९
प्रमाणपत्र नसलेले रुग्णालये - ५३
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या घटनेनंतर सर्वच खासगी व सरकारी रुग्णालयांमधील फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाचे बांधकाम झाल्यानंतर प्रत्येक रुग्णालयाला मनपाच्या अग्निशमन विभागाची एनओसी घ्यावी लागते. मात्र, शहरातील ३०९ रुग्णालयांपैकी २५६ रुग्णालयांनी मनपा अग्निशमन विभागाची एनओसी घेतली असून, ५३ रुग्णालयांनी अद्यापही एनओसी घेतलेली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
शहरातील ३०९ रुग्णालयांपैकी जवळपास सर्वच रुग्णालयांनी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे नोंदणी केली आहे. मात्र, एनओसी २५६ रुग्णालयांनी घेतली आहे. ज्या रुग्णालयांनी एनओसी घेतली नाही त्यात अनेक नामांकित रुग्णालयांचा समावेश आहे. तर अनेकांची नोंदणीची मुदत संपली आहे. मात्र, अनेक रुग्णालयांनी महिना उलटून देखील अद्याप नुतनीकरण केलेले नाही. त्यामुळे शहरातील अनेक रुग्णालये या घटनांबाबत अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येतात. फायर ऑडिट करून घेणे गरजेचे असून, भंडारा येथे झालेल्या घटनेनंतर देखील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना अद्यापही याबाबत उदासीनता दिसून येते. रुग्णालयाचे बांधकाम झाल्यानंतर सर्व माहिती अग्निशमन विभागाला देवून, नोंदणी करून नाहरकत प्रमाणपत्रे घेतली जातात. तसेच हे प्रमाणपत्र वर्षभराच्या मुदतीनंतर पुन्हा नुतनीकरण करून घ्यावी लागतात. मात्र, अनेक रुग्णालये मुदत संपून देखील अनेक महिने नाहरकत प्रमाणपत्राचे नुतनीकरण करून घेण्यात आलेले नाही. दरम्यान, भंडारा येथील घटनेनंतर मनपा प्रशासन देखील खळबळून जागे झाले असून, नुतनीकरण व नाहरकतप्रमाणपत्र घेतले नाही अशा रुग्णालयांना नोटीस बजाविणार आहेत.
सहा वर्षांपुर्वी घडला होता प्रकार
जिल्हा समान्य रुग्णालयात २०१४ मध्ये जिल्हा शल्याचिकित्सकांच्या कार्यालयाला आग लागली होती. यामध्ये अनेक महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली होती. सुदैवाने ही घटना जनरल वाॅर्ड किंवा रुग्ण असलेल्या भागात झाली नसल्याने कोणतीही जीवीतहानी या आगीच्या घटनेत झाली नव्हती. तसेच दीडवर्षभरापुर्वी विसनजी नगर भागातील एका खासगी रुग्णालयात देखील आग लागली होती. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी रुग्णांचे हाल झाले होते. या दोन घटना सोडल्यास शहरात सुदैवाने कोणत्याही आगीच्या घटना घडल्या नाहीत.
शासकीय रुग्णालयांकडे आवश्यक एनओसी
शहरात मनपाचे सहा रुग्णालये व जिल्हा सामान्य रुग्णालय मिळून सात शासकीय रुग्णालये आहेत. या सातही रुग्णालयांकडे मनपा अग्निशमन विभागाचे नाहरकरत प्रमाणपत्र घेतले असून, दरवर्षी या रुग्णालयांकडून नुतनीकरण देखील वेळेवर केले जात असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
कोट..
शहरातील ३०९ रुग्णालयांपैकी २५० हून अधिक रुग्णालयांनी नाहरकत प्रमाणपत्र घेतले आहे. तसेच ज्या रुग्णालयांनी हे प्रमाणपत्र घेतले नाही, किंवा नुतनीकरण केले नाही. अशा रुग्णालयांना नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. तसेच अनेक खासगी रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घेतले आहे.
-शशिकांत बारी, विभागप्रमुख, अग्निशमन विभाग, मनपा