हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 07:27 PM2018-06-02T19:27:10+5:302018-06-02T19:27:10+5:30
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तापी नदीवरील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ साचल्याचे ‘मेरी’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
आॅनलाईन लोकमत
वरणगाव, ता. भुसावळ, दि.२ : जळगाव जिल्हयातील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ‘मेरी’ या संस्थेने मार्च २०१७ साली केलेल्या सर्वेक्षणात धरणाच्या साठवण क्षमतेच्या निम्म्यापेक्षा अधिक भाग गाळाने व्यापल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच जलसंपदा विभागाला प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार हतनूर प्रकल्प उभारणीपासून गेल्या ३५ वर्षात धरणात ५४ .४५ टक्के गाळ जीवंत पाणी साठ्यात गोळा झाला आहे . यापूर्वी ‘मेरी’ने २००७ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार त्या वेळी धरणातील मृत पाणीसाठ्यात ८१ टक्के गाळ साचला होता. वेळीच धरणातील गाळ उपसला गेला असता तर आज ही वेळ आली नसती असे जाणकाराचे मत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्यातील एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पावर ही परिस्थिती ओढवली आहे. हतनूर धरणाची ३८८ दश लक्ष घनमिटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यात २०८ दशलक्ष घनमिटर गाळ साचल्याने प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर आली आहे., आणि तीच मोठी भविष्याच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कृषी सिंचनावर परिणाम
सातत्याने धरणात गाळ साचत राहिल्याने त्याचा फटका कृषी सिंचनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. धरण उभारणीपासून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनाकरिता ७० दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून तापी नदी व कालव्याव्दारे सोडले जात असे. परंतु ते कमी होवून फक्त रब्बी हंगामासाठी १८ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकºयांना कृषी सिंचनास पाणी मिळत नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. तर धरणातून (औद्योगिक पुरवठा ) बिगर सिंचनाकरिता ९४ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाते. अशीच परिस्थिती राहिल्यास जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्हयात कृषी सिंचन व उद्योगावर दुष्परिणाम होईल.
खर्चाची मोठी डोकेदुखी
जाणकारांच्या मते आता धरणालील गाळ काढण्याकरिता येणाºया खर्चात नविन प्रकल्प उभा राहिल. एवढा यावर पैसा खर्च होईल.