स्वातंत्र्य चौक ते नेरी नाक्यापर्यंत ५५ खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:18 AM2021-09-19T04:18:06+5:302021-09-19T04:18:06+5:30
स्वातंत्र्य चौक ते पांडे चौकापर्यंत निम्मा रस्ता खड्ड्यात गेलेला ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत स्वातंत्र्य चौकापासून पांडे चौकाकडे जाताना महात्मा ...
स्वातंत्र्य चौक ते पांडे चौकापर्यंत निम्मा रस्ता खड्ड्यात गेलेला
‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत स्वातंत्र्य चौकापासून पांडे चौकाकडे जाताना महात्मा गांधी उद्यानाच्या शेवटच्या भिंतीपर्यंत हा रस्ता चांगला आहे. मात्र, पुढे या रस्त्याच्या मधला निम्मा भाग हा खड्ड्यात गेला आहे. एका बाजूला सिमेंटचा भाग असून, दुसऱ्या बाजूचा भाग हा रस्ता खोदल्यामुळे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याची व्यवस्थितरीत्या डागडुजी न केल्यामुळे, संपूर्ण रस्ता अनेक ठिकाणी खालीवर झाला आहे. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २० ते २५ खड्डे दिसून आले. या रस्त्याची दोन्ही बाजूंनी दुरवस्था झाली असताना, दुसरीकडे साइडपट्ट्यांचीही प्रचंड दुरवस्था झालेली दिसून आले. त्यात खड्ड्यांमधील दगड-गोटे रस्त्यावर इतरत्र विखुरल्यामुळे, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
पांडे चौकातून नेरी नाक्याकडे
जाणाऱ्या रस्त्याचीही प्रचंड दुरवस्था
पांडे चौकातून पुढे नेरी नाक्याकडे जाताना येथील मधल्या रस्त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडलेले दिसून आले, तसेच या रस्त्यावरील साइडपट्ट्याही खड्ड्यात गेलेल्या दिसून आल्या. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, पावसाळ्यात तर या रस्त्यावरून नागरिकांना वाहन काढणेदेखील अवघड झाले होते. ठिकठिकाणी खड्डे आणि चिखल झाल्यामुळे वाहन काढताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. यात काही दुचाकी वाहने घसरण्याचेही प्रकार घडले. एकीकडे वाहनधारकांना त्रास होत असताना, दुसरीकडे पादचारी नागरिकांना तर रस्त्यावरून चालण्यासाठी वाटदेखील नसल्याचे दिसून आले.