55 हजार स्वस्त धान्य दुकानदार 1 ऑगस्टपासून संपावर
By admin | Published: July 2, 2017 05:52 PM2017-07-02T17:52:33+5:302017-07-02T17:52:33+5:30
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय : एकही दुकानदार माल उचलणार नाही
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.2 - सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना शासनात समावेश करून घेण्याचा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. मात्र शासनाकडून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. या मागणीकरीता राज्यातील 55 हजार स्वस्त धान्य दुकानदार 1 ऑगस्टपासून संपावर जाणार असल्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला रविवारी घेतला.
रविवारी जळगाव शहरातील पत्रकार भवनात ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स व राज्य रेशन संघटनेच्या पदाधिका:याची राज्यस्तरीय बैठक झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर, बाबुराव म्हमाणे , जमनादास भाटीया, विजय गुप्ता, गणपत डोळसे-पाटील, ए.के.खान, संजय देशमुख, जगन्नाथ धोटे, अण्णाजी शेटे, देवीदास देसाई, शहाजी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह राज्यभरातून आलेले संघटनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पैशांसाठी नाही, जगण्यासाठी लढा पुकारा
यावेळी बोलताना गजानन बाबर म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांकडून जो संप पुकारण्यात येत आहे. तो संप हा कुठल्याही सरकार विरोधात नसून, तो दुकानदारांच्या हक्कासाठीचा लढा आहे. आता पैशांसाठी नाही तर जगण्यासाठी लढा पुकारा असे आवाहन बाबर यांनी केले.
1 ऑगस्टपासून राज्यभरातील दुकानदार संप करणार असून संप काळात एक ही दुकानदार माल उचलणार नाही असा ठराव राज्यस्तरीय बैठकीत अध्यक्ष गजानन बाबर यांनी जाहीर केला. हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे.
सामूहिक आत्मदहनाचा इशारा
संघटनेचे उपाध्यक्ष जमनादास भाटीया यांनी सांगितले की, संपाच्या काळात सर्व दुकानदारांनी एकोपा दाखविण्याची गरज आहे. जोर्पयत मागणी पूर्ण होणार नाहीत. तोर्पयत संप कायम ठेवण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील भाटीया यांनी दिला.