जळगाव जिल्ह्यात विविध योजनांवर ५७ कोटी रूपयांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:56 PM2018-09-02T12:56:06+5:302018-09-02T12:57:05+5:30
६३ टक्के खर्च
जळगाव : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तीन कोटी ७५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून विविध योजनांवर वार्षिक खर्चाच्या तुलनेत ५७ कोटी रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
जिल्ह्यातील वार्षिक योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा २ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे घेणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील वार्षिक योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यासाठी ३०१ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी ७० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत केलेल्या निधीपैकी ५७ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. वार्षिक योजनांवर वितरीत केलेल्या निधीच्या ६३ टक्के खर्च झाला आहे.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि परिसरांचा विकास करण्याकरीता २९ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी तीन कोटी ७५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यात भडगाव तालुक्यातील कनाशी मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र व गिरणा नदी परिसर, मेहरूण तलाव सुशोभिकरण, पारोळा येथील बालाजी मंदिर, चाळीसगाव येथील मस्तानी टेकडी, दर्गा परीसर विकासासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.