जळगाव शहरालगतच्या कुसुंबा येथे ५७ हजाराची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:04 PM2018-02-08T17:04:42+5:302018-02-08T17:06:17+5:30
चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडत रोख रक्कम, दागिने व लॅपटाप लांबविले
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.८- तालुक्यातील कुसुंबा येथे राजेश विश्वांभर वाणी (वय ३६ रा.मोरया नगर, कुसुंबा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव्ह असा ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुसुंबा येथे राहणारे राजेश वाणी हे खासगी कंपनीत मार्केटींगचे काम करतात. पत्नी विद्या, आई निर्मलाबाई व मुलगी असे एकत्र राहतात. आई ६ रोजी फत्तेपूर येथे नातेवाईकाकडे गेलेली आहे तर पत्नी आठवडाभरापासून माहेरी आहे. राजेश यांनी कंपनीचे काम असल्याने ते बुधवारी औरंगाबाद येथे गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. गुरुवारी सकाळी घराचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती शेजारी राहणाºया कल्पना तायडे यांनी राजेश यांना दिली. त्यामुळे त्यांनी तातडीने जळगाव गाठले. घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता तर कपाटातील ५७ हजारांचा ऐवज गायब झाल्याचे लक्षात आले. वाणी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.