९ दिवसांत शहरात ६ बाधित, एकानेही घेतलेली नाही लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:31+5:302021-08-12T04:19:31+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ९ दिवसांमध्ये शहरात ६ नवे बाधित आढळून आले आहेत. ...
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ९ दिवसांमध्ये शहरात ६ नवे बाधित आढळून आले आहेत. या सहाही जणांनी लस घेतलेली नसल्याची माहिती समोर आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही, तेच शक्यतोवर कोरोनाबाधित आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे लसीकरण करून घेऊन नागरिकांनी स्वत:ला सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
जिल्हाभरात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला लसींचा पुरेसा साठा नसल्याने ब्रेक लागला आहे. मात्र, त्याआधी १० लाखांच्या वर नागरिकांनी लस घेतलेली आहे. लस घेतल्यानंतर बाधित आढळून येण्याचे प्रमाण सुरुवातीला अधिक होते; मात्र, आता अत्यंत कमी लोकांना संसर्ग होत आहे. दरम्यान, गेल्या ९ दिवसांची स्थिती बघितली असता जे कोणी बाधित आढळून आले आहेत त्यांनी लस घेतलेली नव्हती. अशा स्थितीत अधिकाधिक लसीकरण होणे व नागरिकांनी ते करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात कधी किती पॉझिटिव्ह?
१ ऑगस्ट ०४
२ ऑगस्ट ०१
३ ऑगस्ट ०३
४ ऑगस्ट ०४
५ ऑगस्ट ००
६ ऑगस्ट ०५
७ ऑगस्ट १०
८ ऑगस्ट ०३
९ ऑगस्ट ०३
कुठल्या तालुक्यात किती लसीकरण?
तालुका पहिला डोस टक्केवारी दुसरा डोस टक्केवारी
अमळनेर ४८७७१, १६ टक्के, १३५०२, ४ टक्के
भडगाव २८११३, १७ टक्के, ७३४५, ४.५० टक्के
भुसावळ १०५२८९, २९ टक्के, ३५४७२, ९.८६ टक्के
बोदवड १४७४४, १६ टक्के, ३८४५, ४.१८ टक्के
चाळीसगाव ६३७८७, १५ टक्के, १८९८१, ४.५७ टक्के
चोपडा ५४३२२, १७ टक्के, १२६६३, ४ टक्के
धरणगाव ९०५७, ५ टक्के, ७६९७, ४ टक्के
एरंडोल २२३८६, १३ टक्के, ६२७१ ३ टक्के
जळगाव २०३८२९, ९४ टक्के, ७८४४३ ३६ टक्के
जामनेर ४९३६८, १४ टक्के, १४३०८, ४ टक्के
मुक्ताईनगर २४८५८, १५ टक्के, ७०२३ ४.२९ टक्के
पाचोरा ४७२०३ १४ टक्के, १२३७७ ४ टक्के
पारोळा २७६२४, १४ टक्के, ७३८७, ३.७५ टक्के
रावेर ५५३८७, १७ टक्के, १६५८२, ५ टक्के
यावल ४५८१८, १६ टक्के, १३९८४, ५ टक्के
धरणगाव तालुक्यात सर्वांत कमी लसीकरण
जिल्हाभरात धरणगाव तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वांत कमी लसीकरण झाले आहे. या ठिकाणी केवळ ५ टक्के लोकांनीच पहिला डोस घेतला आहे. तर ४ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तालुक्याची लोकसंख्या १,७३,४४७ असून, यापैकी पहिला डोस ९,०५७ तर दुसरा डोस ७,६९७ नागरिकांनी घेतला आहे. तर दुसरीकडे जळगाव तालुक्यात सर्वाधिक ९४ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस व ३४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.