रेल्वेत पकडला ६ लाखाचा गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:56 PM2018-10-02T12:56:31+5:302018-10-02T12:56:49+5:30
आरक्षित बोगीतून ८ बॅगा जप्त
जळगाव : पुरी-ओखा या एक्सप्रेसच्या वातानुकुलित आरक्षित बोगीतून जाणारा सहा लाख रुपये किमतीचा गांजा रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सोमवारी रात्री आठ वाजता पकडला. विशेष म्हणजे या गांजासोबत एकही व्यक्ती नव्हता. त्यामुळे त्याचा मालक, वाहतूक करणारा व खरेदी करणारा कोण हे स्पष्ट होऊ शकले नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुरी ओखा या एक्सप्रेसच्या बी-२ या वातानुकुलित बोगीतून गांजा जात असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) निरीक्षक महेंद्र पाल यांना मिळाली होती. त्यानुसार पाल यांनी सापळा यशस्वी व्हावा म्हणून हेडकॉन्स्टेबल आर. एन.पाटील, विक्रम वाघ, प्रमोद सांगळे व रंगलाल जाधव यांचे पथक भुसावळ येथे पाठविले. ही गाडी भुसावळ स्थानकावर येताच पथक बी-२ या बोगीत शिरले. तपासणी करीत असताना या बोगीतील ३४ ते ३७ या क्रमांकाच्या आरक्षित सीटजवळ ८ बॅगा संशयास्पद दिसून आल्या. बोगीतील प्रवाशांना विचारणा केली असता मालक म्हणून कोणीच पुढे आले नाही.
रात्री ७.४० वाजता ही गाडी जळगाव स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. निरीक्षक महेंद्र पाल व सहकारी तेथे थांबूनच होते.
दरम्यान, या सर्व बॅगा उतरवून आरपीएफच्या कार्यालयात आणण्यात आल्या. सर्व बॅगांमध्ये पॅकेट तयार करुन ठेवण्यात आले होते. या पॅकेटला वरुन चिकटपट्टीचे आवरण लावण्यात आले होते. यातील काही पाकीट आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी फोडून तपासणी केली.