मोबाईलच्या नादात गमविले ६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:12 PM2019-03-23T12:12:58+5:302019-03-23T12:13:29+5:30
वडीलांचे पैसे देण्यासाठी केला बालकाचा अपहरणाचा प्लॅन
जळगाव : युवकाने मोबाईलवर गेम खेळताना वडीलांच्या बँक खात्यातून सुमारे ६ लाखांची रक्कम गमविल्यानंतर ती रक्कम वडीलांना परत कशी करावी, या तणावात असलेल्या त्या युवकाने चक्क एका अपार्टमेंटमधील घरात प्रवेश करीत बालकाच्या गळ्याला चाकू लावून महिलेला पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला आहे़ पोलिसात याबाबत कुठलीही तक्रार दिलेली नसल्यामुळे या घटनेप्रकरणी पोलिसात नोंद नाही़
रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दतील रहिवासी २० वर्षीय सुनील (नाव बदलेले) हा युवक डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे़ शिक्षक असलेल्या वडिलांच्या बँक खात्यात सहा लाख रूपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा होती़ सुनील याने वडीलांच्या मोबाईलमध्ये आॅनलाईन गेम खेळतांना बँक खात्यातून तब्बल ६ लाख गमविले. हा प्रकार सुनीलच्या वडीलांच्या लक्षात आला़ बँकेतील पेैशांबाबत त्यांनी सुनीलला विचारले़ त्याने लवकरच पैसे परत येतील असे वडीलांना सांगितले़ मात्र, पैसे परत न आल्यामुळे वडीलांनी वारंवार पैशांबाबत विचारणा केल्यामुळे सुनील हा तणावात होता़
अन् रचला चोरीचा प्लॅन
वडीलांना पैसे परत करायचे असल्याने त्याने चोरीचा प्लॅन रचला. परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एका गृहस्थाच्या सुनीलने घरात प्रवेश करून ६ वर्षीय बालकाच्या गळ्याला चाकू लावला. अन् बालकाच्या आईला घरातील जितके पैसे असतील तितके घेवून या नाहीतर मुलाला मारून टाकेल अशी धमकी दिली़
महिलेने आरडाओरड करताच नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला.
तक्रार देण्यास दिला नकार
महिला प्रचंड घाबरलेली असल्याने महिलेने पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी सुनीलच्या वडीलांना फोन करून घटनेची माहिती दिली़ काही वेळानंतर युवकाच्या वडीलांनी पोलीस स्टेशन गाठले़ मात्र, महिलेने तक्रार न दिल्याने याबाबत पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नव्हता.