जळगावात डॉक्टरांच्या पत्नीचे तोंड दाबून व हातपाय बांधून चोरट्यांनी लुटला ६ लाखाचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:12 PM2018-09-09T12:12:40+5:302018-09-09T12:13:25+5:30
डॉ.नरेंद्र दोशी यांच्या घरात भरदिवसा लूट
जळगाव : शहरातील दोशी व आर्किड हॉस्पिटलचे संचालक डॉ.नरेंद्र दोशी यांच्या पत्नी भारती (वय ७२) यांचे हातपाय बांधून व तोंड दाबून चोरट्यांनी घरातील साडे तीन लाख रुपये रोख, सव्वा दोन लाखाचे दागिने, मोबाईल असा पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज भर दिवसा लुटून नेल्याची थरारक घटना शनिवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडली.
घरातील नोकर माधुरी पवार ही दुपारी एक वाजता डॉ.नरेंद्र दोशी यांचा जेवणाचा डबा देण्यासाठी दोशी हॉस्पिटलमध्ये गेली होती तर दुसरी नोकर यशोदाबाई ही किचन ओटा सफाईचे काम करीत असताना धिप्पाड शरीरयष्टीचे दोन तरुण घरात आले. भारती दोशी या किचनच्या ओट्याजवळ बसून पाणी पित असताना त्यांनी या दोघांना तुम्ही कोण, काय काम आहे, घरात कशासाठी आलात अशी विचारणा केली असता त्यातील पांढरा शर्ट घातलेल्या तरुणाने काहीही न बोलता भारती यांचे तोंड दाबून खाली पाडले तर काळ्या शर्ट घातलेल्या तरुणाने यशोदाबाईला खाली पाडले. झटापटीत दोन्ही महिलांची ताकद अपूर्ण पडली. या दोन्ही तरुणांनी नायलॉनच्या दोरीने हातपाय बांधले.
श्वान पथक घुटमळले
या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे श्वान बंगल्याच्या परिसरातच घुटमळले. तीन ते चार वेळा वस्तू सुंगविल्यानंतरही हे श्वान बाहेरचा माग दाखवत नव्हते. जिल्हा पेठचे उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी यांनी भारती यांच्याकडून घटना समजूत घेत त्यांचा जबाब नोंदविला. सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सुप्रिया देशमुख, रामानंद नगरचे बी.जी.रोहोम यांच्यासह अधिकारी बंगल्यात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. दरम्यान,याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम ३९२, ४५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.दोशींकडे तीन महिला नोकर
डॉ.नरेंद्र दोशी हे पत्नी भारती यांच्यासह गांधी नगरातील जय बंगल्यात वास्तव्याला आहेत. मुलगा डॉ.परेश हे बी.जे.मार्केटसमोरील डॉ.दोशी हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर वास्तव्य करतात तर मुलगी पारु ओरा या मुंबईला वास्तव्याला आहेत. घरकामासाठी तीन महिला नोकर आहेत. त्यातील यशोदाबाई गवळी ही किचनचे काम करते तर माधुरी पवार कंपाऊडच्या बाहेरील साफसफाई व सोनल घरातील धुणी भांडी करते. यशोदाबाई व माधुरी दोन्ही जण बंगल्याच्या आवारातच राहतात.
कमरेला लावलेल्या चाव्या हिसकावल्या व ऐवज घेवून पोबारा
दोन्ही चोरट्यांनी भारती यांच्या कमरेला लावलेला चाव्यांचा गुच्छा हिसवकावून बेडरुमध्ये गेले. फर्निचरच्या कपाटातील ट्रॅव्हलींग बॅग काढली. ती बॅग घेऊन दोघांनी पोबारा केला. या बॅगेत साडे तीन लाख रुपये रोख, दोन लाख रुपये किमतीच्या दहा तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, २० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची साखळी, अडीच हजार रुपये किमतीच दोन सोन्याचे मंगळसूत्र व एक हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ऐवज या बॅगेत होता.
चोरट्यांचा २० मिनिटे धुमाकूळ
एक वाजता घरात आलेले चोरटे १ वाजून २० मिनिटांनी घराबाहेर पडले. दीड वाजता माधुरी पवार ही डबा देऊन परत आली असता तिने दरवाज्याची बेल वाजविली. यावेळी यशोदाबाई हिने कशी तरी सुटका करुन घेत दरवाजा उघडला असता भारती यांचे हातपाय बांधलेले दिसून आले. माधुरी हिने भारती यांना सोडविले. त्यानंतर त्यांनी बेडरुमध्ये जावून पाहिले असता कपाट उघडे होते व ट्रॅव्हलींग बॅग गायब होती. दरम्यान, चोरटे दुसऱ्या दरवाजाने घराच्या बाहेर गेल्याचा संशय आहे.
सीसीटीव्हीची वायर कापली, डीव्हीआर केला बंद
डॉ.दोशी यांच्या बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. डॉ.दोशी सकाळी ९ वाजता हॉस्पीटलमध्ये गेल्यानंतर ९.१० वाजता सीसीटीव्ही कॅमेरा बंद झालेला आहे. डीव्हीआरची वायर काढण्यात आलेली असून इतर कॅमेºयाची वायर कापण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या तपासणीत यशोदाबाई ही किचन ओटा साफ करताना दिसून येत आहे तर आज प्रथमच ती बेडरुमध्ये गेल्याचे चित्रण झाले.
चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ
शहरात चोरी व घरफोडीच्या घटना कमी होण्याऐवजी त्यात दिवसेदिंवस वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात चोरी व घरफोडीच्या १५ घटना घडल्या आहेत. सप्टेंबर महिन्यातही ही मालिका सुरुच आहे. शनिवारची घटना तर मुख्य रस्त्याला लागून पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. दोशी यांच्या निवासस्थानाजवळ दोन दवाखाने आहेत. तेथे नेहमीच लोकांची वर्दळ असते.
पोलीस अधीक्षकांना थेट फोन
डॉ.दोशी यांच्याकडे जबरी चोरीचा प्रकार झाल्यानंतर त्यांचे पूत्र डॉ.परेश दोशी यांनी रावेर दौºयावर असलेले पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना घटनेची माहिती दिली. शिंदे यांनी लागलीच पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना घटनास्थळावर रवाना केले.
यशोदाबाईला घेतले ताब्यात
सीसीटीव्ही कॅमेºयाची वायर कापणे, डीव्हीआरची वायर काढणे, कधी नव्हे बेडरुमधील साफसफाई करणे या बाबींवर पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी नोकर यशोदाबाई हिची दोन तास बंगल्यातच चौकशी केली. बोलण्यातही तफावत आढळून आल्याने ेतिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी यशोदाबाईला ताब्यात घेतले. तिला डॉक्टरांनी काही कामावरुन काढले होते. आठ महिन्यानंतर तिला परत कामावर घेण्यात आले आहे.