‘लम्पी’मुळे आणखी ६ जनावरांचा मृत्यू; चोपडा, जळगावातही शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 07:39 PM2023-08-25T19:39:37+5:302023-08-25T19:40:09+5:30
‘लम्पी’चे संकट निवारण्यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शामकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे
कुंदन पाटील
जळगाव : जिल्ह्यातील नऊ तालुक्यात ‘लम्पी’ने पशुधनावर मृत्यूसंकट उभे केले आहे. शुक्रवारी ६ जनावरांचा मृत्यू झाला.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ३६ हजार ८८२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले.त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी ९१ इतकी झाली आहे.
धरणगाव (३), अमळनेर(६), पारोळा (१८), जामनेर (२), पाचोरा (२), जळगाव (२), चाळीसगाव (३४) तालुक्यातील ६७ जनावरांना शुक्रवारी लम्पीची लागण झाली. त्यामुळे सध्या बाधीत जनावरांची संख्या ४२९ वर गेली आहे.
तालुकानिहाय जनावरांचा मृत्यू
धरणगाव (१), पारोळा (७), जळगाव (१), एरंडोल (८), पाचोरा (७), चोपडा (५५), चाळीसगाव (५), अमळनेर (१) या तालुक्यात आतापर्यंत ८५ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरणासाठी धावाधाव
‘लम्पी’चे संकट निवारण्यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शामकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. शुक्रवारी ३६ हजार ८८२ जनावरांना लसीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात ५ लाख १९ हजार ३३६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ५८ हजार ६६४ जनावरांचे लसीकरण अपूर्ण आहे. येत्या दिवसात लसीकरण मोहिम पूर्ण होईल, अशी माहिती डॉ.पाटील यांनी दिली.
भरपाईचे प्रस्ताव तयार
दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या ८५ पशुमालकांना भरपाई देण्यासाठी तालुका पातळीवर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. शनिवारी या प्रस्तावांचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्यावतीने नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला ३० हजारांची, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार व वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे.