पाटणादेवी जंगलात आढळले ६ बिबटे
By admin | Published: May 11, 2017 07:20 PM2017-05-11T19:20:44+5:302017-05-11T19:20:52+5:30
शहराच्या दक्षिणेला १८ कि.मी. अंतरावर असणा-या गौताळा अभयारण्य व पाटणादेवी जंगल परिसरात प्राणी गणनेत ६ बिबटे आढळले असून गत वर्षाच्या तुलनेत यंदा
चाळीसगाव (जि. जळगाव) : शहराच्या दक्षिणेला १८ कि.मी. अंतरावर असणा-या गौताळा अभयारण्य व पाटणादेवी जंगल परिसरात प्राणी गणनेत ६ बिबटे आढळले असून गत वर्षाच्या तुलनेत यंदा विविध प्राण्यांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. १० रोजी बुद्ध पौर्णिमाच्या पर्वावर सकाळी ११ वा. प्राणी गणनेला सुरुवात झाली होती. जवळपास २४ तास ही गणना चालली.
यासाठी जंगलात गस्तीसाठी २३ निरीक्षण केंद्रे उभारण्यात आले होती. वनविभागाचे १५ कर्मचारी व ५० निसर्गप्रेमी गणनेत सहभागी झाले होते. यावेळी तीन बिबटे, एक मादी व दोन पिले आढळले तर इतर प्राण्यामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. बोढरे येथे एक, ओढरे येथे एक, जुनोने येथे एक असे तीन बिबटे दिसून आले. जुनोने पाझर तलावावर रात्री ११.२० ते दीड वाजेदरम्यान एक मादी व दोन पिले आढळली. मादीने दोन्ही पिल्लांना आंघोळ घातली. पिले मादीभोवती काही वेळ फिरत होती असे दृष्यही दिसून आले.
दरम्यान आणखी ४ ते ५ बिबटे या जंगलात असल्याचा अंदाज असून त्यांचे दर्शन मात्र गणनेत होवू शकले नाही. याचवेळी तडस, लांडगे, कोल्हे, निलगाय, ससे, माकड, मोर, रानडुक्कर ,ऊदमांजर, सायाळ, हरीण, भोकर, काळवीट आदी प्राणीही दिसून आले.
गोताळा वन्यजीव, आॅट्रम घाटाचे वन्य संरक्षक पी.व्ही.जगत, चाळीसगाव वन्यजीव विभागाचे वनक्षेञपाल एल.एम.राठोड, वनपाल आर.बी.शेटे, मानद वन्यजीव संरक्षक व सर्पमित्र राजेश ठोंबरे आदींचा गणनेत मुख्य सहभाग होता.