शाळा प्रवासासाठी ६ विद्यार्थ्यांना मिळणार भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:14+5:302021-04-06T04:15:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ६ विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना दरमहा ३०० रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचा भत्ता त्यांच्या आईच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत कलम ६ (३) (१) नुसार नजीकच्या शाळांच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत, अशा वस्त्यांमधील ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मोफत परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. जेथे एस.टी.ची सुविधा नाही तेथे केंद्र शासनाकडून वाहतुकीकरिता प्रति विद्यार्थी दरमहिन्याला ३०० रुपये असे १० महिन्यांसाठी तीन हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येते. यावर्षी मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांना १० महिन्यांऐवजी केवळ दोन महिन्यांचा वाहतूक भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील ०६ विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत.
कोरोनाचा बसतोय फटका
यावर्षी कोरोनामुळे शाळा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. जागतिक महामारीचा शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. सुरुवातीला ऑनलाइन शाळा सुरू होत्या. त्यानंतर राज्यातील सर्व शाळा अर्थात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे पूर्ण शैक्षणिक वर्षात हे वर्ग दोन महिने सुरू राहिले. त्यामुळे केंद्र शासनाच्या सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत १० महिन्यांसाठी मिळणारा भत्ता यावर्षी फक्त दोन महिन्यांकरिता मिळणार आहे.
- जिल्ह्यातील ०६ विद्यार्थी त्यासाठी पात्र असून, त्यांना दरमहा ३०० रुपये असे दोन महिन्यांकरिता ६०० रुपयांप्रमाणे ३ हजार ६०० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
- हा भत्ता पालकांच्या विशेषत: आईच्या बँक खात्यावर जमा करण्याचा शासनाचा निर्णय आहे.
- या योजनेसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांतील ८४७० विद्यार्थी पात्र असून, त्यांना दरमहा ६०० रुपयांप्रमाणे ५० लाख ८२ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
यावर्षी कोरोनामुळे २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश होते. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना यंदा केवळ दोन महिन्यांचाच भत्ता मिळणार आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या आईच्या खात्यावर भत्ता जमा होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील समग्र शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
मुक्ताईनगरातील विद्यार्थ्यांचा समावेश
वाहतूक भत्त्यासाठी जिल्ह्यातील सहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत. हे पात्र विद्यार्थी मुक्ताईनगर तालुक्यातील असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. निधी प्राप्त झाल्यानंतर पैसे विद्यार्थ्यांच्या आईच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.