जळगावात गॅस पंपावर कारमधून ६० हजाराची रोकड असलेली बॅग लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:24 PM2018-11-01T22:24:01+5:302018-11-01T22:26:23+5:30
गॅस पंपावर कारमध्ये गॅस भरत असताना सुटाबुटात असलेल्या चोरट्याने कारमध्ये ठेवलेली ६० हजार रुपये रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी ख्वॉजामिया चौकातील गॅस पंपावर घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव : गॅस पंपावर कारमध्ये गॅस भरत असताना सुटाबुटात असलेल्या चोरट्याने कारमध्ये ठेवलेली ६० हजार रुपये रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी ख्वॉजामिया चौकातील गॅस पंपावर घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील खेडी भोकरी येथील ठिबक नळ्यांचे व्यापारी रणछोड सुभाष पाटील (वय ३६) हे ठिबक नळ्या घेण्यासाठी गुरुवारी ओमनी कारने (क्र.एम.एच.१९ सी.यु.४६१६) जळगावात आले होते. येताना त्यांनी घरुन २० हजार रुपये आणले होते. शहरातील पंजाब नॅशनल बॅँकेतून ४० हजार रुपये काढले. ही रक्कम काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवली व गणेश कॉलनी रस्त्यावरील ख्वॉजामिया चौकातील शंकरलाल रतनलाल आॅटो या गॅस पंपावर कारमध्ये गॅस भरण्यासाठी दुपारी १२.४५ ते १.२५ दरम्यान आले होते.
मोबाईलवर बोलण्याचे नाटक करीत साधला डाव
रणछोड पाटील हे कारच्या मागे बोनेट उघडण्यासाठी आले. त्यावेळी क्लिनर साईडने एक सुटाबुटातील असलेला तरुण मोबाईलवर बोलत आला. उच्च राहणीमान असल्याने तो चोरटा आहे याची किंचितशीही कल्पना नव्हती. गॅस भरल्यानंतर पंपावरील कर्मचाºयाला दोन हजार रुपये देत असताना चोरट्याने कारमधून बॅग काढून पोबारा केला. रणछोड कार सुरु करायला गेले असता बॅग गायब होती.