‘आरटीई’ च्या ३७१७ जागांसाठी ६ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:53 AM2019-03-24T11:53:14+5:302019-03-24T11:54:24+5:30
२५ टक्के प्रवेश, ३० मार्चपर्यंत वाढविली मुदत
जळगाव : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांसाठी तेरा दिवसात आतापर्यंत ६ हजार १४५ अर्जांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. आता पुन्हा शासनाकडून आॅनलाइन अर्जासाठी ३० मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे़ यासह वयाची मयार्दा वाढली आहे. आतापर्यंत बालकाचे वय किमान ६ वर्ष व कमाल वय ६ वर्ष ११ महिने २९ दिवस होते. परंतु समग्र शिक्षा अभियानातर्फे आता कमाल वय ७ वर्ष २ महिने २९ दिवस करण्यात आले आहे.
आरटीईच्या आॅनलाईन प्रवेशाला ५ मार्चपासून सुरूवात झाली होती़ मात्र, पहिल्याच दिवशी पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला़ रात्री १०़३० वाजता आरटीईचे पोर्टल सुरळीत झाल्यानंतर ६ मार्चपासून पालकांना आॅनलाइन अर्ज करण्यास सुरूवात केली़ पोर्टलवर आॅनलाइन बरोबरच मोबाइल अॅपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पालकांकडून मोबाइल अॅपचा फारसा वापर केला जात नसल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील फक्त १४ पालकांनी मोबाईल अॅपद्वारे आॅनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे़ तसेच पालकांना आरटीईच्या २५ टक्के प्रवेशाची अर्ज करण्याची तारीख ५ ते २२ मार्च पर्यंत देण्यात आली होती़ परंतु अर्ज करण्याची तारीख ३० मार्च करण्यात आली आहे.
प्रवेश नाकारल्यास कारवाई
पालकाला प्रवेश नोंदणी करताना १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा अधिक अंतरातील फक्त १० शाळा निवडता येतील. परंतु प्रत्यक्ष एकच शाळेला प्रवेश मिळणार आहे. सदर कालावधीमध्ये पालकाने आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करायचे आहे. अन्यथा पुढच्या फेरीत त्या पाल्याचा विचार केला जाणार नाही. कोणत्याही सबळ कारणाअभावी शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. २५ टक्के प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश मिळाल्यानंतर तसा एसएमएस शाळांना व पालकांना पाठविण्याची व्यवस्था राहील. पालकांचे संपर्क क्रमांक प्रवेश नोंदणी करतेवेळी घालणे आवश्यक असतील.
६ हजार १४५ अर्जांची नोंदणी... आरटीईतंर्गत इयत्ता पहिलीमध्ये जिल्ह्णातील २७४ शाळांमधील ३७१७ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे़ यासाठी यंदा तीन फेऱ्या राबविण्यात आल्या आहेत़ यंदा तेरा दिवसात पोर्टलवर ३७१७ जागांसाठी आतापर्यंत तब्बल ६ हजार १४५ अर्जांची नोंदणी झाली आहे़ आता अर्जांच्या नोंदणीसाठी ३० मार्चपर्यंत मुदत वाढविली असल्यामुळे या संख्येमध्ये आणखीन मोठ्या संख्येने वाढ होण्याच्या शक्यता आहे़