जिल्ह्यात कोरोनाचे नवे ६०५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 09:28 PM2021-03-09T21:28:27+5:302021-03-09T21:28:49+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये अचानक वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये अचानक वाढ झाली असून सलग दुसऱ्या दिवशी पाच कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात तीन जण हे ४५ वर्षांखालील असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात ६०५ कोरोना बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात सोमवारी एक २२ आणि एक ३८ अशा दोन कमी वयाच्या बाधितांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. तेच दुसऱ्या दिवशी चोपडा तालुक्यातील ४० वर्षीय पुरूष, भुसावळ तालुक्यातील ४० वर्षीय महिला आणि जामनेर तालुक्यातील ४३ वर्षीय पुरूष यांच्यासह चोपडा तालुक्यातील ७० वर्षीय पुरूष आणि चाळीसगाव तालुक्यातील ६६ वर्षीय पुरूष यांचा मृतांमध्ये समावेश आहे. कमी वयाच्या मृत्यूमागे उशिरा रुग्णालयात दाखल होणे व अन्य व्याधी अशी कारणे असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
शहर पुन्हा हॉटस्पॉट
जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक किंबहुना २०० पेक्षा अधिक रुग्ण एकट्या जळगाव शहरात आढळून येत आहेत. मंगळवारी शहरात २०५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. १३९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही २३१७ वर पोहोचली आहे.
पाच मोठे हॉटस्पॉट
जळगाव शहर : २०५
चाळीसगाव : ७९
भुसावळ : ५३
धरणगाव : ५२
चोपडा : ४५
अहवालांची चिंता मिटली
मंगळवारी एकाच दिवसात ५ हजार ८५५ अहवाल प्राप्त झाले. दिलासादायक बाब म्हणजे यात बाधितांचे प्रमाण कमी आढळून आले असून २०६ जण यात बाधित आढळले आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या १२०१ वर आली आहे. शिवाय नियमित आता ॲन्टीजन चाचण्या वाढविण्यात आल्या असून आरटीपीसीआरचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. त्यामुळे अहवाल लवकर येतील, असा दावा केला जात आहे.
ReplyForward |