पुरवणी परीक्षेत ६२ टक्के विद्यार्थी पुन्हा ‘नापास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:58+5:302020-12-24T04:15:58+5:30
जळगाव : नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा ...
जळगाव : नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये जळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल ४७.७८ टक्के तर बारावीचा २९.०७ टक्के निकाल लागला आहे. दरम्यान, दहावी-बारावी पुरवणी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६२ टक्के विद्यार्थी पुन्हा ‘नापास’ झाले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलै महिन्यात जाहीर करण्यात आला होता. या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची लागलीच जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा आयोजित केली होती. मात्र, या काळात कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नंतर २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली. दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकूण २ हजार ३०० विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते़ त्यापैकी ८६२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
दहावीचे ५४० विद्यार्थी पुन्हा ‘नापास’
दहावी पुरवणी परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील अनुत्तीर्ण झालेल्या १ हजार ८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १ हजार ३४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ४९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ४७.७८ टक्के आहे. दरम्यान, दहावीच्या पुरवणी परीक्षेत ५४० विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झालेले आहेत.
बारावीचे फक्त ३६८ विद्यार्थी उत्तीर्ण
बारावी पुरवणी परीक्षेसाठी १ हजार २७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार २६६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातून फक्त ३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर तब्बल ८९८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहे़ निकालाची टक्केवारी ही २९.०७ टक्के आहे.
कॉपी केल्याचे विद्यार्थ्याने केले मान्य
नाशिक विभागात दहावी पुरवणी परीक्षेमध्ये ३ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले होते. त्यातील २ विद्यार्थ्यांचा कॉपी प्रकाराशी संबंध नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर एका विद्यार्थ्याने कॉपी केल्याचे कबूल केले असून मंडळाच्या शिक्षासूचीनुसार कार्यवाही केली जाणार आहे.
आजपासून करता येणार गुणपडताळणीसाठी अर्ज
निकाल जाहीर झाल्याचा दुसरा दिवस अर्थात २४ डिसेंबरपासून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची आहे, त्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. २ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती हव्या असतील त्यासाठी २४ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
पूनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायांकितप्रत आवश्यक
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाचे पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात, विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.