रावेर तालुक्यात पिकांचे ६३ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 04:25 PM2020-09-23T16:25:49+5:302020-09-23T16:27:00+5:30
कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे.
किरण चौधरी
रावेर : कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तीन हजार हेक्टर व वादळी पावसाने केळीसह खरिपाचे १ हजार १२५. ९७ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ६३ कोटी रुपयांची अपरिमित झाल्याचा प्रशासनाने अंदाज वर्तविला आहे. तथापि, गत चार-पाच दिवसांपासून सातत्याने कुठे अर्धा तास, कुठे पाऊण तास तर कुठे तासभर कोसळधाºया पावसाने आता खरिपातील उभ्या कापसाच्या पिकाच्या निम्मे कैºया सडून काळ्या पडल्याने तर फुललेल्या बोंडातील कापूस ओला होऊन मातीमोल होत असल्याने तथा उभ्या ज्वारी पिकांची कणसे काळी पडून ऐन तोंडी आलेला उत्पन्नाचा घास वाया जाणार असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. बुधवारीही तालुक्यात दुपारी तासभर व सायंकाळीही मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
रावेर तालुक्यात जूनच्या आरंभी तीन टप्प्यात झालेल्या वादळी पावसाने ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त होऊन ३७ कोटींचे नुकसान झाले होते. तेव्हा शासन दरबारी नुकसानीचे पंचनामेही सादर करण्यात आले. किंबहुना, केळी फळपीक विमा कंपन्यांनी स्वतंत्र पंचनामे करून लाल फितीत बंदिस्त केले आहेत.
दरम्यान, खरिपाच्या उडीद व मूग पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उडीद, मूगाच्या हंगामाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. अपवादात्मक परिस्थितीत उडीद, मूगाचे आलेले चांगले उत्पादनही पावसात भिजल्याने हातचे गेल्याची शोकांतिका आहे. खरीप हंगामाची बोहणीच भोपळ्याने झाल्याने नेत्रसुखद असलेल्या खरिपातील कापूस, ज्वारी, मका, भुईमूग, सोयाबीन व तीळ पिकांना काळाची दृष्ट लागली.
दरम्यान, कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने तालुक्यातील तीन हजार हेक्टरमधील केळी बाधित होऊन ६० कोटी ५५ लाख रुपयांचे तर नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या पायथ्यापासून ते तापी काठापर्यंत ३८ गावातील १ हजार १२५. ८७ हेक्टरमधील केळीबागा, ज्वारी, मका तूर व कापसाचे पीक जमीनदोस्त होऊन अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. एकंदरीत, ६३ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्रश्न निकाली निघत नाही तोच गत पाच-सहा दिवसांपासून अधून-मधून काही भागात अर्धा तास, काही भागात पाऊण तास तर काही भागात तासन् तास होत असलेल्या कोसळधार पावसाने आता उभ्या खरिपाचीही धुळघाण होऊन गंभीर वाताहत सुरू झाली आहे.
तालुक्यात सरासरी ६५०.४३ मि.मी. अर्थात ९७.३६ टक्के पाऊस झाला असला तरी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐन कापणी व मळणीच्या प्रतीक्षेत असलेले ज्वारीचे कणसं काळी पडून ज्वारी रंगहीन व बुरशीने कुजून वजनाने हलकी होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे ज्वारीचचया उत्पन्नाचा ऐन तोंडी येणारा घास वाया जाण्याची शक्यता आहे. किंबहुना, खरीपपूर्व लागवडीखालील आघात कापसाच्या वेचणीच्या प्रतीक्षेत बोंडावर फुललेला कापूस सततच्या पावसामुळे ओला होऊन खाली पडून मातीमोल होत आहे. किंबहुना परिपक्व झालेल्या कापसाच्या झाडावरील निम्म्यापेक्षा जास्त कैºया काळ्या पडून सडत आहेत. त्यामुळे केळी बागायतीत व खरीप उत्पादनात उत्पन्नाची आशा कमालीची धुसर झाली आहे.