ग्रामीण यंत्रणेत ७० पैकी ६५ व्हेंटिलेटर वापरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:28+5:302021-04-04T04:16:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली असून, शासकीय आणि खासगी दोनही यंत्रणांमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली असून, शासकीय आणि खासगी दोनही यंत्रणांमध्ये व्हेंटिलेटर रुग्णांना उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र कायम आहे. रुग्णसंख्या व त्यातही गंभीर रुग्णांची संख्या अधिक वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेत असलेल्या ७० पैकी ६५ व्हेंटिलेटर हे वापरात असून, पाच व्हेंटिलेटरचे अपडेशन झाले नसल्याने ते बंद अवस्थेत आहेत. दरम्यान, जळगाव शहरात व्हेंटिलेटर मिळत नसल्याने शहरातील रुग्ण बाहेरगावी उपचार घेत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मार्चच्या मध्यंतरीही बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बेड मॅनेजमेंट, वॉर रूमच्या माध्यमातून बेड उपलब्धतेची प्रक्रिया सोयीस्कर झाली आहे. अन्यथा अधिकच भयावह स्थिती राहिली असती. अनेकांना एका कॉलवर कुठे बेड उपलब्ध आहे याची माहिती मिळत आहे. मात्र, रुग्णालयात पुरेशी जागा नसल्याने व सामान्यांना माहिती नसल्याने अनेक वेळा रुग्णांची पळापळ होत आहे. जिल्ह्याला गेल्या वर्षी पीएम केअरमधून व्हेंटिलेटर प्राप्त झाले हाते.
शासकीय यंत्रणेतील व्हेंटिलेटर
१८४
उपचार सुरू असलेले एकूण रुग्ण
११७१८
जीएमसीतील गंभीर रुग्ण
५४
जीएमसीतील एकूण व्हेंटिलेटर
९४
कुणी व्हेंटिलेटर देता का व्हेंटिलेटर
१ जळगाव शहर व चोपडा तालुक्यात रुग्णसंख्या अधिकच झपाट्याने वाढत असून, या ठिकाणी गंभीर रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. जळगाव शहरात सर्वाधिक मृत्यू नोंदविले जात आहेत. त्यामुळे जळगाव शहरात व्हेंटिलेटर उपलब्धतेचा मुद्दा गंभीर झाला होता.
२ चोपड्यात काही व्हेंटिलेटर आल्यानंतर त्यातील काही बाहेर पाठविण्यात आल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे. शिवाय या ठिकाणी व्हेंटिलेटर नसल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यााचे प्रकरण समोर असताना अशा स्थितीत या ठिकाणी अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
३ जळगाव शहरात व्हेंटिलेटर नसल्याने शहरातील एक रुग्णाला उपचारासाठी पाचोरा येथे दाखल करण्यात आले आहे. खासगीतही व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र आहे.
कोट
ग्रामीण रुग्णालयांमध्ये कुठे दोन, कुठे एक अशी व्हेंटिलेटर दिली आहेत. परिस्थितीनुसार ती देण्यात आली आहेत. ७० व्हेंटिलेटर पैकी ६५ उपयोगात आहेत. पाच व्हेंटिलेटरचे इंजिनिअर न आल्याने ती इन्स्टॉलेशन झालेली नाहीत. डेमो झालेला नाही. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
या ठिकाणी व्हेंटिलेटर बाकी
पहूर, न्हावी, यावल, रावेर या ठिकाणी पाच व्हेंटिलेटरचे इन्स्टॉलेशन झालेले नाही. मात्र, ज्या ठिकाणी जेवढी व्हेंटिलेटर देण्यात आली आहेत, ती सर्व सुरळीत सुरू असून, सद्य:स्थितीत सर्वत्र पॅक आहेत.
जळगाव शहरात तर खासगीतही व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. नॉर्मल बेड उपलब्ध आहेत, मात्र ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे अधिक कठीण झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर आपत्कालीन विभागात अनेक वेळा खुर्चीवर ऑक्सिजन लावून रुग्णांना वेटिंगवर ठेवले जाते. त्यानंतर कक्षात जागा झाल्यानंतर त्यांना कक्षात हलविले जाते.