लाखभर घरांना ६६ हजार नळांनी पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:17 AM2021-02-09T04:17:54+5:302021-02-09T04:17:54+5:30
शहराची लोकसंख्या - ५ लाख ५० हजार एकूण घरे - १ लाख २० हजार अधिकृत नळधारक - ६६ हजार ...
शहराची लोकसंख्या - ५ लाख ५० हजार
एकूण घरे - १ लाख २० हजार
अधिकृत नळधारक - ६६ हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराला वाघूर धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहरात एकूण १ लाख २० हजार घरे असताना केवळ ६६ हजार घरांनाच नळ कनेक्शन देण्यात आले आहे. शहरात २० हजारहून अधिक अनधिकृत नळधारक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. अमृत अंतर्गत नवीन नळ कनेक्शन दिले जात असले तरी यामध्ये ही माहिती समोर आली आहे.
शहरातील सध्याची पाणी पुरवठ्याची पाईपलाईन ही अनेक वर्ष जुनी आहे. त्यामुळे वाढीव भागात अद्यापही पाणी पुरवठा संदर्भातील अडचणी आहेत. अनेक भागात नागरिकांनी मनपाच्या व्हॉल्व किंवा पाईनलाईनवरून अनधिकृत रित्या नळ कनेक्शन घेतले असून, यामुळे मनपाला पाणी पट्टीची रक्कम देखील मिळत नाही. मनपाला उत्पन्न तर मिळतच नाही दूसरीकडे पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. शहराची गेल्या दहा वर्षात मोठी हद्द वाढली आहे. नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे या भागात जुनी जलवाहिनी पोहचली नाही. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांनी अनधिकृतरित्या नळ कनेक्शन घेतले आहे. मनपाकडून काही महिन्यांपुर्वी सर्व्हे देखील करण्यात आला होता. यामध्ये अनेक भागात अनधिकृतरित्या नळ कनेक्शन घेतल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन शहरातील नवीन भागात देखील पोहचली आहे. यामुळे अनधिकृत कनेक्शन मनपाचे शुल्क घेवून अधिकृत केले जात आहेत.
२० हजारहून अधिक अनधिकृत नळ
शहरात एकूण १ लाख २० हजार घरे आहेत. त्यापैकी ६६ हजार घरांमध्येच अधिकृत नळ कनेक्शन असून, सुमारे २० हजार जण अनधिकृतरित्या मनपाचे पाणी वापरत आहेत. अमृत अंतर्गत सुरु असलेल्या कामांमुळे ही माहिती समोर आली आहे. याआधीही मनपाने सर्व्हे केला होता.
दररोज हजारो लीटर पाणी जाते वाया
शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळती व लॉसेस मुळे वाया जात आहे. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या हजारो लीटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मनपाकडून दरवर्षी ४० लाख रुपयांचा खर्च शहरातील पाईनलाईनच्या गळत्यांवर होत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठीही मनपाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, अमृतचे काम पुर्ण झाल्यानंतरच वाया जाणाऱ्या पाण्याची काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.
अमृत अंतर्गत सर्वांना नळ कनेक्शन
- शहरात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे जवळपास ९० टक्के काम पुर्ण झाले असून, अनेक भागात नळकनेक्शन देण्याचे काम सुरु झाले आहे. आता नळ कनेक्शन देताना, ज्यांनी आधी कनेक्शन घेतले नव्हते अशांना देखील मनपाकडून नळ कनेक्शन दिले जात आहे.
-जे अनधिकृत नळधारक आहेत. त्यांना नळ कनेक्शन दिले तर मनपा प्रशासनाला पाणी पट्टीच्या माध्यमातून उत्पन्न देखील मिळणार आहे.