‘खाकी’ तील ६६१ योद्धेही झाले कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:43+5:302021-05-04T04:07:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चाललेला आहे. गेल्या वर्षापासून ते ३० एप्रिलपर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चाललेला आहे. गेल्या वर्षापासून ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १ लाख २२ हजार ४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला तर २,१८४ जणांचा त्यात मृत्यू झालेला आहे. लोकांचा जीव वाचावा यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर कर्तव्य बजावताना खाकीतील ६६१ जणांना कोरोनाची बाधा झाली तर ८ जणांचा त्यात मृत्यू झालेला आहे. हा संघर्ष येथेच थांबलेला नाही, तर अजून तडपत्या उन्हात खाकी राबतेय.
दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात ३२ हजार ९८६ जणांना कोरोनाची लागण झाली तर ५५९ जणांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या संख्येने भयंकर कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. पोलीस बंदोबस्तावर थांबले तर त्याला नक्कीच आळा बसतो. कारवाई व दंडाच्या भीतीमुळे नागरिक किमान मास्कचा तरी वापर करतात. आता तर विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी केली जात आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला तेथूनच थेट कोविड सेंटरला पाठविले जात आहे.
गस्त आणि बंदोबस्ताचाही ताण
गुन्ह्यांचा तपास आणि गस्त ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. जे कर्मचारी बंदोबस्तावर असतात, त्यांच्याकडे तपास दिला जात नाही. तपासावर असलेल्यांना बंदोबस्तातून वगळले जात आहे, असे असले तरी कोरोनाच्या बंदोबस्तातून कोणीही सुटत नाही. रोज सायंकाळी २ तास अख्खी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरवली जात आहे. त्यात स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे देखील रस्त्यावर असतात. १७ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कडक नियम लागू झाला आहे, तेव्हापासून खाकी रस्त्यावर आहे.
शासनाकडून ५० लाखांची मदत
जिल्हा पोलीस दलातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६ जणांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५० लाखांची मदत देण्यात आली आहे. दोन प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.
अशी आहे पोलीस दलातील कोरोनाची स्थिती
एकूण बाधित : ६६१
होम क्वारंटीन : ११ (२ अधिकारी)
रुग्णालयात दाखल : ०२
बरे झालेले : ६३२
मयत : ०८
कर्तव्यावर हजर : ६४०
एकूण तपासणी : १,७५६
एकूण निगेटिव्ह : १,०९५