वाळू उपशाला आळा घालण्यासाठी बांभोरीतून ६७ वाहने, ५० ब्रास वाळू जप्त
By विजय.सैतवाल | Published: August 19, 2023 03:22 PM2023-08-19T15:22:23+5:302023-08-19T15:22:33+5:30
पोलिस, महसूल प्रशासन व आरटीओंची संयुक्त कारवाई
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बेसुमार वाळू उपशाळा आळा घालण्यासाठी शनिवार, १९ ऑगस्ट रोजी पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात संयुक्त कारवाई करीत गावातून ५३ ट्रॅक्टर व १४ ट्रक, डंपर जप्त केले. तसेच ठिकठिकाणी साठवून ठेवलेली ५० ब्रास वाळूदेखील जप्त करण्यात आली. पहाटे पाच वाजताच पथक गावात पोहचले व कारवाईचा धडाका सुरू केला.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा व तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. त्याला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या निर्देशानुसार शनिवार, १९ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजताच तीनही विभागाचे पथक बांभोरी गावात पोहचले व कारवाई सुरू केली.
बांभोरीनजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पथकाने या नदीपात्रात जाऊन पाहणी केली. तेथे काही वाहने आढळली. ती ताब्यात घेऊन गावाकडे आपला मोर्चा वळविला.
ट्रॅक्टर, ट्रक, डंपरमधून वाळू वाहतूक होत असल्याने वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी गावातील ही वाहने जप्त करण्याच्या उद्देशाने गावातून तब्बल ६७ वाहने जप्त करण्यात आली. गावात फिरुन एक-एक करता ५३ ट्रॅक्टर, १४ ट्रक, डंपर पथकाने जप्त केले.
गावात ठिकठिकाणी साठवून ठेवलेल्या वाळूलाही लक्ष्य करीत पथकाने ती शोधून काढली. वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण ५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. जेथे वाळू साठा होता तो जेसीबीच्या सहाय्याने वाहनामध्ये भरुन जप्त करण्यात आला.