६ हजार सेविकांना जि.प.ने बजावल्या नोटीसा ६७२ सेविका झाल्या रुजू
By Ajay.patil | Published: January 18, 2024 06:47 PM2024-01-18T18:47:55+5:302024-01-18T18:48:21+5:30
शेकडो अंगणवाडीसेविका, मदतनिसांनी जि.प.समोर येऊन, जि.प.च्या नोटीसांची होळी केली होती.
जळगाव - विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडीसेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडीसेविकांनी ३ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ६ हजारहून अधिक सेविकांनी सहभाग घेतला आहे. जि.प.प्रशासनाने सर्व सेविकांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जि.प.च्या नोटीसला केराची टोपली दाखवत, अंगणवाडीसेविकांनी आपला संप सुरुच ठेवला आहे.
तर बुधवारी शेकडो अंगणवाडीसेविका, मदतनिसांनी जि.प.समोर येऊन, जि.प.च्या नोटीसांची होळी केली होती. तर जि.प.च्या नोटीसनंतर ४४ अंगणवाडीसेविका, ६०४ मदतनीसच कामावर रुजू झाल्याची माहिती जि.प.कडून देण्यात आली आहे. तसेच आगामी काही दिवसात ही संख्या वाढेल असाही दावा जि.प.प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ३ डिसेंबरपासून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे जिल्ह्यातील ३ हजार अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या वाटपावर देखील मोठा परिणाम झाला आहे.
५७४ अंगणवाड्या सुरु...
जिल्ह्यात एकूण ३ हजार ४३५ अंगणवाड्यात आहेत. त्यापैकी सध्यस्थितीत ५७४ अंगणवाड्या सुरु आहेत. तर ३ हजार अंगणवाड्या बंदच आहेत. सुरु असलेल्या अंगणवाड्या देखील ग्रामपंचायत प्रशासनामुळे सुरु आहेत. अंगणवाडीसेविकांच्या संपामुळे पोषण आहार वितरणासह अनेक कामं रखडली आहेत. त्यात कुपोषणाचा आढावा जो प्रत्येक महिन्याला घेतला जातो, तो आढावा घेण्याचेही काम दीड महिन्यांपासून थांबले आहे.