जळगावात चोरट्यांकडून १२७ ग्रॅमच्या ७ सोनसाखळ्या हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:50 PM2018-01-06T21:50:48+5:302018-01-06T21:53:08+5:30
शहर व जिल्ह्यातून ११ ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा-या तिन्ही चोरट्यांकडून १२७ ग्रॅमच्या सात सोनसाखळ्या, ४ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ५० हजाराची दुचाकी असा ३ लाख ७ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या तिन्ही चोरट्यांना पोलीस ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, ६ : शहर व जिल्ह्यातून ११ ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा-या तिन्ही चोरट्यांकडून १२७ ग्रॅमच्या सात सोनसाखळ्या, ४ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ५० हजाराची दुचाकी असा ३ लाख ७ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या तिन्ही चोरट्यांना पोलीस ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेंगोळा, ता.जामनेर येथील यात्रेत पैशांची उधळपट्टी करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर आलेल्या करण प्रल्हाद मोहीते ( मुळ रा.तरवाडे, ता.चाळीसगाव), दीपक रेवाराम बेलदार (मुळ रा.खडकी-बोरगाव, ता.बोदवड) व दिनेश गजेंद्र मोहीते ( मुळ रा. तळेगाव, ता. जामनेर) तिन्ही ह.मु. पिपरीया, ता.वापी, जि.बलसाड, गुजरात यांच्या मुसक्या गेल्या महिन्यात आवळण्यात आल्या होत्या. दरम्यान, पोलीस कोठडीचा हक्क राखून या तिघांची कारागृहात रवानगी झाली होती. या काळात तहसीलदारांसमोर ओळख परेड झाली असता त्यात दोन महिलांनी या चोरट्यांना ओळखले होते.
दागिने जसेच्या तसेच
पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी या तिघांना ‘खाकी’ हिसका दाखविला असता त्यांनी १२७ ग्रॅम दागिने काढून दिले. ज्या पध्दतीने सोनसाखळ्या व मंगलपोत लांबविण्यात आल्या होत्या अगदी जशाच्या तशा अर्धवट तुटलेले दागिने त्यांच्याकडे आढळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचे ४ मोबाईलही आढळून आले. या तिघांचा साथीदार मच्छिंद्र पवार (रा.सिल्वासा, गुजरात) हा फरार असून त्याच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले आहे.
गुन्हे आढावा बैठकीत पथकाचे कौतुक
सोनसाखळी लांबविणा-या टोळीला पकडण्यासह मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुन्हे आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष कौतुक केले. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, राजेंद्र होळकर, सागर शिंपी, उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, उत्तमसिंग पाटील, मनोहर देशमुख, मुरलीधर अमोदकर, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र घुगे, विनोद पाटील, नारायण पाटील, रवींद्र पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशील पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, सतीश हळणोर, अशोक चौधरी, बापु पाटील, विलास पाटील , दत्तू बडगुजर, महेंद्र पाटील, जयंत चौधरी, गफूर तडवी, अशोक पाटील व दर्शन ढाकणे यांचा समावेश आहे.