मोहाडी रुग्णालयात ७ रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:16 AM2021-04-09T04:16:51+5:302021-04-09T04:16:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मोहाडी शिवारातील महिला रुग्णालयात शंभर बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू झाले असून या ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोहाडी शिवारातील महिला रुग्णालयात शंभर बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू झाले असून या ठिकाणी बुधवारी रात्री ७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नसून त्यांना सामान्य कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या ठिकाणी सुरूवातीला थेट ॲडमिशन न करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व इकरा कोविड हेल्थ सेंटरच्या रुग्णांना या ठिकाणी हलविण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जागेचा मुद्दा गंभीर बनल्याने अखेर या रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले होते. युद्धपातळीवर हे व अन्य कामे पूर्ण करून अखेर हे रूग्णालयात सेवा उपलब्ध झाली आहे. डॉक्टर रुजू झाले आहेत. यात जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनीही या ठिकाणी पाहणी केल्यानंतर मनुष्यबळाचा मुद्दा सोडविण्यासाठी काही सीएचओ या ठिकाणी देण्याचे त्यांनी सांगितले आहे.
तीन कक्ष
माेहाडीच्या या रुग्णालयात सामान्य कक्ष, ऑक्सिजन बेड तसेच आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकाणी व्हेंटिलेटरर्सचीही सुविधा असून जागेचा मोठा ताण यामुळे वाचला आहे. दरम्यान, पाण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या ठिकाणी शंभर पाण्याचे जार आणण्यात आले आहेत. वापरण्यासाठी मोठ्या टाक्यांची व्यवस्था आहे. मात्र, काही भागात नळ जोडणीचे काम बाकी असल्याने हा एक प्रश्न कायम आहे. अद्याप काही भागात काम सुरू आहे. टप्प्या टप्प्याने या ठिकाणी रुग्ण दाखल करण्यात येणार आहे.
जीएमसीत स्थिती काहीशी सामान्य
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली जागेची तारांबळ आपात्कालीन विभागातील भयावह स्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे. यात रुग्ण येण्याचे प्रमाण काहीशे कमी झाल्याने परिस्थिती सामान्य होत असल्याची माहिती आहे. अनेक रूग्ण बरे होऊन घरी जात आहेत.