खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी नेमले ७ पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 06:52 PM2019-04-02T18:52:28+5:302019-04-02T18:54:16+5:30
भडगावची घटना: २५ कर्मचारी लागले जोरदारपणे कामाला
भडगाव : एकाच कुटुंबातील तिघांच्या फाशीच्या घटनेच्या ‘सुसाईड नोट’ वरून याच कुटुंबातील बालकाच्या खुनाच्या गुन्ह्याचा २४ तासाच्या आत उलगडा झाल्यानंतर पोलिसांची तपासचक्रे आता खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शोधण्यासाठी वेगाने फिरत आहेत. यासाठी ७ पथके नेमण्यात आली आहेत.
पोलीस महानिरीक्षक
यांनी फिरवली तपासाची सूत्रे
टोनगाव भागातील बांगडी विक्रेते सैय्यद यांच्या कुटुंबात सर्व तिघांनी आत्महत्या केल्यानंतर भडगाव येथे ३१ मार्च रोजी नासिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी भेट दिली. भडगाव येथे तब्बल ४ तास पेक्षा जास्त वेळ पोलीस महानिरीक्षक यांनी ठाण मांडल्याची पहिलीच वेळ होती. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा भडगाव पोलीस ठाण्या बाहेर होता. छावणीचे स्वरूप येथील परिसरात निर्माण झाले होते. दरम्यान पोलीस महानिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन घराची पाहणीही केली.
वडील, आई आणि बहिण या तिघांच्या आत्महत्या या बालकाच्या मृत्यूशी निगडीत असून अनैसर्गिक कृत्यातून झालेला बालकाच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासअधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी ७ पोलीस पथके तयार केली आहेत. त्यांच्याकडे नागरिक, बालक/ महिलांकडून माहिती घेणे, संगणक विभाग, वाहन यंत्रणा, बाहेरील व गावातील फिरते पथक नेमून विविध कामे सोपविण्यात आली आहेत. या नेमलेल्या पथकात २५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .
तिसरी सुसाईड नोट
पोलिसांना मयतांच्या घरातुन अधिक तपासणीत एकाच विषयाच्या एकूण ३ सुसाईड नोट मिळून आल्या . २ त्यांच्या जवळ व १ घरात सुसाईड नोट मिळाली. त्यात मुलाच्या मृत्यू नंतर घरमालक देत असलेला त्रास व मुलाच्या खुनाचा गुन्हा उघड होत नसल्याच्या विरहात आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान आरोपींची कसुन चौकशी केली असता मयत बालक इशानच्या शवविच्छेदनासाठी १५ हजार रुपये त्याच्या पालकाकडून घेतल्याची कबुली दिली. तसेच या बालकाच्या मारेकऱ्यांचा लवकरच शोध लावु असा विश्वासही पोलीस निरीक्षक येरुळे यांनी व्यक्त केला.