भोरटेक शिवारात विषबाधेने ७० मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 07:26 PM2019-06-19T19:26:36+5:302019-06-19T19:32:56+5:30
नीलकंद खाल्ल्याने विषबाधा होऊन ७० मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर पशुवैद्यकीय यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने सुमारे तीनशेवर शेळ्या-मेंढ्यांना जीवदान मिळाले आहे. भोरटेक, ता.भडगाव शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली.
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : नीलकंद खाल्ल्याने विषबाधा होऊन ७० मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर पशुवैद्यकीय यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने सुमारे तीनशेवर शेळ्या-मेंढ्यांना जीवदान मिळाले आहे. भोरटेक, ता.भडगाव शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत पशुपालकाचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सूत्रांनुसार, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या चराईसाठी जळगाव जिल्ह्यात दरवर्षी आणतात. पिपराळा, ता.नांदगाव येथील भीमा सोमा शिंदे हे आपल्या परिवारासह साधारण चारशे ते पाचशे मेंढ्या व शेळ्या घेऊन जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
१८ रोजी होळ, ता.भडगाव शिवारात नांगरलेल्या शेतात आपल्या मेंढ्या चारून ते भोरटेक शिवारात पोहचले. दुसऱ्या दिवशी १९ रोजी सकाळी एका मागे एक करीत ७० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या व अनेक मेंढ्या ह्या अजूनही अत्यवस्थ आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्याने अंदाजे तीनशे ते चारशे मेंढ्या व शेळ्यांचा जीव वाचला.
यांनी केले उपचार
पशुवैद्यकीय अधिकाºयात डॉ.एस.व्ही. शिसोदे, एस.एस.कसबे, डॉ.डी. एम.महेर, डॉ.एस.के.शेळके, डॉ.जी.बी. माळी, डॉ.संताजी पाटील, डी. बी.पाटील,वाय. एन.जडे या टीमने वेळीच उपचार केल्याने बाकी मेंढ्या व शेळ्या वाचल्या. मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले.
तब्बल ७० ते ८० मेंढ्या प्राण सोडत असल्याचे पाहून पशुमालकाने एकच हंबरडा फोडला व मोठ-मोठ्याने छाती ठोकून रडायला लागला. त्यामुळे उपस्थित लोकांचेही मन गहिवरले होते.
या मेंढ्यांनी कुठले तरी गवत व काही कंद खाल्ल्यामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे कजगाव व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पंचनामा भोरटेकचे तलाठी रत्नदीप माने यांनी केला. यावेळी तालुका कृषीधन विकास अधिकारी डॉ.एस.व्ही. शिरोडचे पशुधन विकास अधिकारी डॉ.सागर कसबे, भोरटेकचे सरपंच उमेश देशमुख, ग्रामसेवक एस.बी.मोरे, भोरटेकचे पोलीस पाटील राजेंद्र महाजन, दिनेश पाटील, कजगावचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, डॉ.दिनकर मेहेर, सुधाकर शेळके, डी.बी.माळी, दिलीप पाटील, योगेश जडे, सतीश पाटील आदी उपस्थित होते.
मोठे संकट
गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळाने पशुधन सांभाळणे मुश्किल झाले आहे . त्यांचा जीव वाचविण्यासाठी पशुमालक वाट्टेल ते प्रयत्न करत आहेत. ते वाचवत असतानाच या मेंढपाळावर आलेले हे मोठे संकट आहे.