आरएल समूहाच्या ३१५.६० कोटींच्या ७० मालमत्ता जप्त. ईडीची कारवाई
By विजय.सैतवाल | Published: October 15, 2023 04:23 PM2023-10-15T16:23:13+5:302023-10-15T16:23:33+5:30
स्टेट बँक व आर. एल. समूहात थकीत कर्जप्रकरणी परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरू आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आरएल समूहाने घेतलेले कर्ज थकल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) या समूहाच्या ठिकठिकाणच्या ३१५.६० कोटींच्या ७० स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती ईडीने १५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, कारवाईबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसून या विषयी माहिती घेत वकिलांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल, असे आर. एल. समूहाचे संचालक मनीष जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
स्टेट बँक व आर. एल. समूहात थकीत कर्जप्रकरणी परस्परविरोधी दावे केल्याने वाद सुरू आहे. थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. यात ऑगस्ट महिन्यात ‘ईडी’ ने आर. एल. समूहाच्या सर्व आस्थापनांवर छापे टाकून तपासणी केली होती. तपासणी केल्यानंतर ईडी पथकांनी जळगावातील आर. एल. ज्वेलर्सच्या शोरूममधील रोख रक्कम जप्त करण्यासह शोरुममधील सोन्याचा स्टॉकदेखील सील केला होता.
दोन महिन्यांनंतर पुन्हा जप्तीची कारवाई
ऑगस्ट महिन्याच्या कारवाईनंतर ईडीने १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पुन्हा जप्तीची कारवाई केली. त्याविषयी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात ईडीने म्हटले आहे की, जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड, कच्छ आणि इतर ठिकाणी ७० स्थावर मालमत्ता, पवनचक्क्या, चांदी, हिऱ्यांचे दागिने सारख्या चल आणि अचल मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. यात राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर. एल. गोल्ड व मानराज ज्वेलर्स, प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन, मनीष ईश्वरलाल जैन आणि इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. सीबीआयने भादंविच्या विविध कलमांतर्गत नोंदवलेल्या तीन एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला असून कंपन्या आणि त्यांचे संचालक, प्रवर्तक हे गुन्हेगारी कटाच्या गुन्ह्यांमध्ये अडकले.
षडयंत्र, फसवणूक, खोटेपणा आणि गुन्हेगारी वर्तन अशा चुकीच्या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाला ३५२.४९ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे ईडीच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अशी कर्जे मिळवण्यासाठी प्रवर्तकांनी बनावट आर्थिक माहिती सादर केल्याचे तपासात उघड झाले असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी, ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाणे येथील राजमल लखीचंद समूहाच्या १३ अधिकृत आणि निवासी परिसरात शोधमोहीम राबवली होती आणि सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते.
वकिलांचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ
ईडीने कोणत्या प्रकरणात कारवाई केली याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. या विषयी माहिती घेत वकिलांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल. प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास आहे.
- मनीष जैन, संचालक, आर. एल. समूह.