म्युकरमायकोसिसच्या खासगीत ७० शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:24+5:302021-05-16T04:15:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराची लागण होण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराची लागण होण्याचे प्रमाण वाढत असून, खासगी यंत्रणेत असे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. यात ७० ते ८० रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया झाल्याची माहिती खासगी यंत्रणेकडून समोर आली आहे. शासकीय यंत्रणेत मात्र याचे केवळ १३ रुग्ण नोंदविले गेले आहेत.
म्युकरमायकोसिसचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेेने आता याकडे लक्ष केंद्रित केले आहे. जळगावात मार्च महिन्यापासून याचे रुग्ण समोर यायला सुरुवात झाली होती. अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णांना मुंबई, पुणे या ठिकाणी मोठ्या शस्त्रक्रियेसाठीही पाठविले होते. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची संख्या ही शंभराच्या आसपास असून, ७० ते ८० रुग्णांवर तर जळगावातच शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे.
कक्षाचे नियोजन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ७ क्रमांकाचा कक्ष हा म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी राखीव राहणार असून, या ठिकाणी अशा संशयित रुग्णांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे. डॉक्टरांनी नुकत्याच एका रुग्णाचे परीक्षण केले असून, त्याच्या हिरड्यांमधून पू येत असल्याची घटना समोर आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. कोविडच्या काळात डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक घेत राहणे, याचाही प्रतिकारक्षमतेवर परिणाम होऊन हा बुरशीजन्य आजार होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय रजा टाकून डॉक्टर करताहेत खासगीत शस्त्रक्रिया
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एक कान, नाक, घसा तज्ज्ञ यांनी दोन महिन्यांपूर्वी वैद्यकीय रजा टाकली हेाती. मात्र, म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत असताना त्यांनी त्यांच्या खासगी रुग्णालयात याच्या विविध शस्त्रक्रिया केल्या. वैद्यकीय रजा संपूनही ते रुजू न झाल्याने शिवाय शासकीय रुग्णालयात आधीच या तज्ज्ञांची कमतरता असल्याने आता डॉ. हितेेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित डॉक्टर वैद्यकीय रजेवर असल्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दुजोरा दिला आहे.
निदान करणेच जिकिरीचे
संशयित रुग्णाच्या लक्षणावरून प्राथमिक निदान होत असले तरी मूळ औषधी सुरू करण्यासाठी अधिकृत निदान होणे गरजेचे असते. त्यासाठी कोविडप्रमाणेच नाक व तोंडातील स्वॅब घेतले जातात. मात्र, यात स्वॅबची मात्रा कोविड तपासणीपेक्षा अधिक असते. ते मायक्रोस्कोपद्वारे तपासले जातात. या प्रकियेला २ ते ३ तास लागतात. मात्र, यात फाल्स निगेटिव्ह येण्याची शक्यता अधिक असल्याने याच्या निदानासाठी हिस्टोपॅथाॅलॉजिकल तपासणी केली जाते. यात बुरशीची लागण झालेल्या अवयवातून एक खपली काढून ती मेणात ठेवली जाते. कारण तिचे सेपरेशन व्यवस्थित व्हावे लागते. यानंतर चार ते पाच दिवसांनी मायक्रोस्कोपमध्ये तपासणी करून याचे योग्य निदान होते. त्यानंतर रुग्णाला योग्य औषधोपचार सुरू करता येतात, असे डॉक्टरांनी सांगितले.