७० वर्षीय वृध्द दाम्पत्याचा संसार मनपाने केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:33 AM2019-03-16T11:33:13+5:302019-03-16T11:36:20+5:30
अतिक्रमण विभागाची अमानवीय कारवाई
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळील झोपडपट्टीला काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमध्ये या ठिकाणच्या २० हून अधिक परिवारांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. मात्र, भंगार बाजारातील अतिक्रमण, धनदांडग्यांनी केलेल्या १०० फुटापर्यंतच्या अतिक्रमणाकडे डोळेझाक करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या डोळ्यात ७० वर्षीय वृध्द दांम्पत्याचा उघड्यावरील संसार खुपल्याने त्यांचा फाटक्या-तुटक्या संसारातील सर्व वस्तु अतिक्रमण विभागाने जमा करत, आपण शहरातील अतिक्रमणाविषयी किती प्रामाणिकपणे काम करत असल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
२५ वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बाजुला असलेल्या झोपडवासियांची २ मार्चची रात्र वैऱ्याची ठरली. यामध्ये ७० वर्षीय विठ्ठल तडोकार यांचीही झोपडी जळाल्याने त्यांच्यावर आपल्या वृध्द पत्नी गीताबाई तडोकार व ३० वर्षीय अपंग मुलगा कैलास तडोकार व आगीत शिल्लक राहिलेल्या साहित्यासह उघड्यावर राहण्याची वेळ आली. ते काही दिवसांपासून शहरातील जि.प.कडून रेल्वेस्टेशनकडे जाणाºया रस्त्यालगत असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाचा बाजुलाच उघड्यावर राहत होते.मात्र,शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनपा अतिक्रमण विभागाचे पथकाने तडोकार यांच्या सर्व साहित्यासह त्यांचे खाण्यापिण्याचे सर्व साहित्य देखील जप्त करून घेतले.
तडोकार यांच्या मुलाकडून विरोध
तडोकार दांम्पत्याला ३० वर्षीय कैलास नावाचा मुलगा आहे.मात्र,तो दोन्हीही पायांनी तो अपंग आहे. तसेच मानसिक आजाराने ग्रसीत आहे. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जेव्हा कारवाईसाठी गेले. तेव्हा तडोकार दांम्पत्य घटनास्थळी नव्हते. मनपा कर्मचाऱ्यांकडून बळजबरीने रस्त्यावरचे सर्व साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकले. तेव्हा कैलासने मनपा कर्मचाºयांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्याचा विरोध अपुरा ठरला.
मनपा कर्मचाºयांनी माणुसकी न दाखवता कैलासची तीनचाकी सायकलही जप्त करून घेतली. तसेच त्याची औषधी देखील जप्त करून घेतली.
नितीन लढ्ढा यांनी केली होती तक्रार
आमदार सुरेश भोळे यांनी अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान यांना या अमानवीय कारवाईबाबत चांगलेच धारेवर धरले. या कारवाईबाबत एच.एम.खान यांना विचारले असता त्यांनी या कारवाईबाबत आपल्याला माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी तक्रार केली असल्याचे सांगितले. त्यांच्या तक्रारीमुळेच ही कारवाई केली असल्याचे खान यांनी सांगितले. दरम्यान, आमदार सुरेश भोळे, कैलास सोनवणे यांनी वृध्द दांम्पत्याला आर्थिक मदत देखील केली.
हे वृद्ध दाम्पत्य महापालिकेत पोहोचल्यानंतर हा सर्व प्रकार लक्षात आला होता. मनपाजवळ रडून हे वृद्ध आपबिती सांगत होते. त्यामुळे सर्वांनीच यावेळी नाराजी व्यक्त केली.
वृध्द दाम्पत्याचे अश्रू पाहूनही मनपा कर्मचाºयांना फुटला नाही पाझर
सर्वच संसारपयोगी साहित्य मनपाने जप्त केल्यानंतर वृध्द दांम्पत्य मनपाच्या प्रशासनाकीय इमारतीच्या प्रवेशव्दारासमोर सुमारे तासभर रडत असतानाही,मनपा कर्मचाºयांना पाझर फुटला नाही.अखेर प्रसिध्दी माध्यमाच्या प्रतिनिधींचा लक्षात हा प्रकार आल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच.एम.खान यांना बोलावून वृध्द दांम्पत्याचे साहित्य परत करण्याची मागणी केली.त्यानंतर आमदार सुरेश भोळे,नगरसेवक कैलास सोनवणेही या ठिकाणी दाखल झाले.तसेच हे साहित्य परत करण्याचा सूचना त्यांनी दिल्या. आमदारांच्या आदेशानंतर मनपाने वृध्द दांम्पत्याचे सर्व साहित्य परत करण्यात आले.
भंगार बाजारावर कारवाईची हिंम्मत दाखवणार का ?
७० वर्षीय वृध्द दांम्पत्य आपल्या ३० वर्षीय अपंग मुलासाठी भिक्षा मागून आपले आयुष्य काढत आहे. त्यांच्या जीवन जगण्याचे उदिष्ट केवळ त्यांचा मुलगा आहे. अतिक्रमण विभागाने त्यांच्याकडील साहित्य जप्त करुन केवळ माणुसकीला काळीमा फासणारेच काम केले आहे. भंगार बाजारातील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.ते काढण्याची हिंम्मत अतिक्रमण विभाग दाखवत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.