भुसावळ येथील ७०० घरांचे अतिक्रमण जमिनदोस्त..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:09 AM2018-11-16T01:09:47+5:302018-11-16T01:13:54+5:30
भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील सुमारे ७०० घरांचे अतिक्रमण गुरूवारी जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी हजाराच्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रारंभी थोडाशा विरोधानंतर अतिक्रमण हटाव शांंततेत पार पडले.
भुसावळ : शहरातील रेल्वे हद्दीतील आरपीडी रोडवरील हद्दीवाली चाळ, चांदमारी चाळ, आणि आगवाली चाळीतील पहिल्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिमेत ७०० घरे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी हजारपेक्षाही जास्त पोलिसांचा बंदोबस्त होता. दरम्यान, शुक्रवारी देखील मोहीम राबविली जाणार आहे.
गुरूवारी सकाळी ६: १४ वाजता डिझेल लोको शेडला चार जेसीबी पाठविण्यात आले. अतिक्रमण हटविण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघून नागरिकांनी स्वत:हून घरातील सामान काढण्यास सुरुवात केली. पोलिसांना कोणतीही जबरदस्ती करावी लागली नाही. घरे खाली झाल्यानंतर १२ जेसीबीद्वारे पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुमारे ७०० घरे जमीनदोस्त करण्यात आली. हा परिसर एखाद्या भूकंप आल्यानंतरच्या परिस्थितीसारखा दिसत होता.
रस्ता बंद
अतिक्रमणातील हद्दीमध्ये सकाळी डीआरएम चौक, रेल्वे हॉस्पिटल, दुर्गामाता मंदिराजवळ, कृष्णचंद्र सभागृह या ठिकाणी पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात रस्ते बंद करण्यात आले होते. महत्त्वाच्या कामासाठी व अधिकारी यांनाच आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश दिला जात होता.
पल पल की खबर पर नजर
डीआरएम आर. के. यादव, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, एडीआरएम मनोज सिन्हा, अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, यांच्यासह रेल्वेच्या ७० अधिकारी क्षणाक्षणाच्या खबरवर नजर ठेवून होते.
एकाही घरात चूल पेटली नाही
१४ रोजी संध्याकाळी पोलिसांच्या रूट मार्चनंतर अनेकांच्या हृदयात धडकी भरली, कोणत्याही परिस्थितीत घर सोडावे लागणार यामुळे नागरिकांनी रात्रभर जागरण करून संसाराचे सर्व साहित्य जुळवाजुळव करून भाड्याचे घर शोधून स्थलांतर केले. अनेकांना घरेच मिळाली नाही. त्यांनी त्याच स्थितीमध्ये सामान रस्त्यावरच ठेवले. या धावपळीत एकाच्याही घरात चूल पेटली नाही. तशात साहित्य वाहण्यासाठी वाहनही मिळेना.
एकाच वेळी दोन हजार पेक्षा जास्त घरे असलेल्या वस्तीतील लोकांनी घरे सोडल्यानंतर इतर ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी शहरातील सर्व भाड्याची वाहने बुक झाली होती अनेकांना वाहने मिळाली नसल्यामुळे त्यांचे साहित्य रस्त्यावर पडून होते. वाहने मिळालेल्याचे ताफे शहरातून स्थलांतर होतांना दिसत होते.
भूकंपासारखी स्थिती
एकाच वेळी अनेक घरे तोडली गेल्याने पूर्ण परिसरमध्ये ढिगारे व अवशेष दिसत होते. भूकंप आल्यासारखी स्थिती येथे जाणवत होती.
तीन तासातच सामान्य स्थिती
शहर वाहतूक शाखेने अतिक्रमण काढण्याच्यावेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता. तसेच दोन दिवसाकरीता मार्ग बंद असल्याचे फलक लावले होते परंतु तीनच तासात सामान्य स्थिती झाल्यानंतर नागरिक ये- जा करीत होते.
लोकप्रतिनिधींविषयी तीव्र नाराजी
शेकडो नागरिक बेघर होत असताना लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून काहीतरी तोडगा काढतील याची नागरिकांना अपेक्षा होती. परंतु खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे दोन्हीही याठिकाणी आले नाहीत. आम्हाला साधा दिलासा सुद्धा दिला नाही. आम्ही कुठे जावे ? कोणाकडे फिर्याद द्यावी? हेच का ते अच्छे दिन...? सबका साथ सबका विकास म्हणणारे कुठे गेले... पंतप्रधान नरेंद्र मोदी घर देणार होते, रोजगार देणार होते हे फक्त जुमलेच राहिले. उलट होते ते आमचे घर, रोजगार त्यांनी हिसकावून घेतले. अशा हृदय हेलावणाऱ्या तक्रारी अनेक महिलांनी केल्या. एकता तायडे या गृहिणीने खासदार रक्षा खडसे यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की, माझे मोठे बाबा वारले आहेत आणि कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर समाजसेविका पुष्पा सोनवणे यांनी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, रमेश मकासरे यांना खडे बोल सुनावले व त्यांच्यासमोर बांगड्या फेकल्या. फक्त गुफ्तगू करा ..... व नेत्यांच्याच मागे फिरा असा वाद या वेळी झाला .