जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटींचे चुकारे मिळणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:17 AM2021-01-23T04:17:00+5:302021-01-23T04:17:00+5:30

- १७ हजार ७७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी - विभागात ६ लाख ११ हजार ७८८ क्विंटल कापूस खरेदी - ९ ...

7000 farmers in Jalgaon division are yet to get Rs 150 crore | जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटींचे चुकारे मिळणे बाकी

जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटींचे चुकारे मिळणे बाकी

Next

- १७ हजार ७७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी

- विभागात ६ लाख ११ हजार ७८८ क्विंटल कापूस खरेदी

- ९ हजार ८४० शेतकऱ्यांना देण्यात आली मालाची किंमत

- ९ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी १७ लाख ५१ हजार १६७ रुपयांची अदायकी

- ७ हजार शेतकऱ्यांना मिळाली नाही चुकऱ्यांची रक्कम

- पणन महासंघाकडे अंदाजे १५० कोटी रुपये घेणे बाकी

राज्याची स्थिती

- राज्यात १ हजार ८०० कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी

- १ हजार २१० कोटी रुपयांची केली अदायगी

- सुमारे २० हजार शेतकऱ्यांना ६२५ कोटींची अदायगी देणे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव - किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पणन महासंघाने दिलेले नाहीत. राज्यातील २० हजार शेतकऱ्यांना अद्याप ६२५ कोटी रुपयांचे चुकारे देणे बाकी असून, यामध्ये जळगाव विभागातील ७ हजार शेतकऱ्यांचे तब्बल १५० कोटी रुपयांचे चुकारे पणन महासंघाकडे बाकी आहेत. शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून ६.३५ टक्के व्याजदराने १५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून, या कर्जास शासनाने हमी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह राज्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच चुकाऱ्यांची रक्कम मिळणार असल्याची माहिती कापूस पणन महासंघाचे विभागीय अध्यक्ष संजय पवार यांनी ‘लोकमत’ ला दिली.

मंजूर होणाऱ्या शासन हमीवर कापूस पणन महासंघास द्यावे लागणारे हमी शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०२०-२१ या हंगामाकरिता केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ५१५ प्रति क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला ५ हजार ८२५ प्रति क्विंटल असा हमी दर निश्चित केला आहे. राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, अनुकूल हवामान यामुळे या हंगामात ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यानुसार पणन व सीसीआयच्या माध्यमातून खरेदी सुरु आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सरकीचे दर वाढल्याने खासगी बाजारात देखील आता कापसाला चांगला उठाव मिळाला आहे. त्यामुळे पणन व सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांचा कल आता खासगी बाजाराकडे वळला आहे.

निर्यात वाढल्याने बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे कापसाची आवक आता कमी झाली आहे. त्यामुळे गठाण, सरकीचे भाव वाढले आहेत. तसेच मागणी देखील जास्त असल्याने कापसाचे दर खासगी बाजारात ६ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. बांग्लादेश, चीन, व्हिएतनाम या देशांमध्ये भारताच्या कापसाची निर्यात देखील वाढली आहे. तर देशातंर्गत मिलांमध्येही कापसाला मागणी आहे. त्यामुळे कापसाची मागणी वाढली असून, आतापर्यंत सर्व गरजू शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे. सधन शेतकऱ्यांनी अजूनही आपला माल विक्रीसाठी काढलेला नाही. मागणी असल्याने खासगी बाजारात कापसाचे दर वाढले असल्याची माहिती कापूस बाजारातील तज्ज्ञ हर्षल नारखेडे यांनी दिली.

Web Title: 7000 farmers in Jalgaon division are yet to get Rs 150 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.