जिल्ह्यातील ७१ टक्के रुग्ण तीनच तालुक्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:29+5:302021-07-26T04:16:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, तशी दिलासादायक स्थिती सर्वच तालुक्यांत आहे. एकूण सक्रिय रुग्णांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, तशी दिलासादायक स्थिती सर्वच तालुक्यांत आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच शंभराखाली गेल्यानंतर, यातीलही ७१ टक्के रुग्ण हे केवळ तीनच तालुक्यात असून, उर्वरित १२ तालुक्यांमध्ये ५ किंवा त्यापेक्षा कमी रुग्णांवरच उपचार सुरू आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताणही हलका झाला आहे.
जिल्हाभरात डेल्टा प्लस व्हेरियंटचे सात रुग्ण आढळून आले होते. मात्र, त्यानंतरही मोठी रुग्णवाढ किंवा मृत्यूचे प्रमाण वाढल्याची धोकादायक स्थिती न उद्भवल्याने, आता सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रित असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. पुन्हा शंभर नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, यात महिना उलटून गेला, तरी अद्याप त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. या कालावधीत रुग्णसंख्या अधिकच कमी झाली असून, डेल्टा प्लसचा धोका नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, गर्दी वाढल्याने कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
यात तीन तालुक्यांत अधिक रुग्ण
जिल्ह्यातील एकूण ९४ सक्रिय रुग्णांपैकी ६७ रुग्ण हे चाळीसगाव, भुसावळ आणि जळगाव तालुक्यात आहेत. उर्वरित २७ रुग्ण हे १२ तालुक्यांमध्ये आहेत. यात तीन तालुके वगळता, सर्वच तालुक्यांमध्ये ५ किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत.
महिन्यानुसार अशा घटल्या ॲक्टिव्ह केसेस
एप्रिल : १०,६६१
मे : ९६५
जून : ६६४
जुलै : ९४
महिन्यानुसार असा वाढला रिकव्हरी रेट
मार्च : ८४.९२ टक्के
एप्रिल : ९०.१४ टक्के
मे : ९४.२१ टक्के
जून : ९७.७३ टक्के
जुलै : ९८. १३ टक्के
अशी आहे रुग्णांची स्थिती
लक्षणे नसलेले रुग्ण ६९
लक्षणे असलेले रुग्ण २५
ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणारा रुग्ण १५
अतिदक्षता विभागात दाखल रुग्ण ०६