शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी ७२ ते ७५ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 07:10 PM2018-12-09T19:10:41+5:302018-12-09T19:11:02+5:30
शेंदुर्णी ता. जामनेर येथील नगरपंचायतीच्या पहिल्या- वहिल्या निवडणुकीसाठी रविवारी भरघोस म्हणजे सरासरी ७२ ते ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
जळगाव : शेंदुर्णी ता. जामनेर येथील नगरपंचायतीच्या पहिल्या- वहिल्या निवडणुकीसाठी रविवारी भरघोस म्हणजे सरासरी ७२ ते ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झाले होते. १७ जागांसाठी ५३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आता सोमवारी होणा-या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या ५३ उमेदवारांमध्ये भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १७, मनसे व शिवसेनेचे प्रत्येकी ८ व अपक्ष ३ उमेदवार आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी विजया खलसे (भाजप), क्षितीजा गरुड (राष्ट्रवादी), मनिषा बारी (शिवसेना) व सरीता चौधरी (मनसे) यांच्यात चुरशीची लढत झाली.
मतदारांना आर्थिक आमीष दाखविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाहेरच्या कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सकाळी साडेनऊपर्यंत बहुतेक केंद्रावर रांगा होत्या. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले. दुपारी मतदानासाठी केंद्रावर गर्दी वाढल्याने दीड वाजेपर्यंत ५१.४ टक्के मतदान झाले होते.
शनिवारी रात्री एका वाहनचालकाला मारहाण करण्यात आली होती, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्यासह पाच जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.