वादळी पावसामुळे रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 07:09 PM2018-06-09T19:09:44+5:302018-06-09T19:09:44+5:30
रावेर तालुक्यात गेल्या बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे २५ गावातील ९८२ शेतकऱ्यांच्या ११३७ हेक्टरवरील केळी बागांचे सुमारे ७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाने वर्तविला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे धिम्या गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
लोकमत आॅनलाईन
रावेर, दि.९ : तालुक्यात वादळी पावसामुळे केळी बागांचे सुमारे ७५ कोटींचे नुकसान झाल्याचा तालुका प्रशासनाने प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम मात्र धिम्या गतीने सुरू असल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील अजनाड, अटवाडे, दोधे, नेहते, खिरवड, विटवे, ऐनपूर, निंभोरा,खिर्डी, दसनूर,सिंगनूर, मस्कावद, आंदलवाडी, वाघोदा, सावदा, जिन्सी, आभोडा, मोरव्हाल, मंगरूळ, मांगी-चुनवाडे, रायपूर, अजंदे, नांदूरखेडा आदी २५ गावात बुधवारी वादळी पाऊस व गारपिटीने दिलेल्या तडाख्यात ९८२ शेतकºयांची ११३७ हेक्टरमधील केळी मातीमोल झाल्याने ७५.७९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालात वर्तविला आहे.
दरम्यान, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांनी व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बाधित क्षेत्राची नुकतीच पाहणी केली.
त्या गावांचे पंचनामे अपूर्णच
दरम्यान, तालुक्यातील निरूळ, पाडळे बु, पाडळे खुर्द परिसरातील १३ गावांना शुक्रवारी वादळी पावसाने तडाखा दिल्याने तेथील नुकसानीचे पंचनामे अद्यापही अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पंचनामे पूर्णत्वास येतील अशी आश्वासने प्रशासनाने दिल्यानंतरही महसूल व कृषी विभागाच्या संथगतीने चाललेल्या कारभाराचा बुरखा पुन्हा फाटला.
वादळामुळे सावदा, थोरगव्हाण, कोचूर शिवारातील ४१ शेतकºयांचे २३ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होवून १ कोटी ५१ लाख ८० हजार रुपयांचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी व महसूल विभाग जिल्हा प्रशासनाकडे सादर करीत नाहीत, तोच मंगळवारी सायंकाळी मध्यप्रदेशाकडून तालूक्यातील पूर्व भागातून शिरकाव करीत तापीकाठावर वादळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसला. ऐन कापणीवरील केळीच्या उत्पादनाचा तोंडी आलेला घास हिरावून घेत नैसर्गिक आपत्तीमुळे अपरिमित हानी झाली. घरावरील टीनपत्र्यांचे छत उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्यांच्यावर संकट उभे ठाकले आहे. अजनाड येथे काहींच्या घरावर वृक्ष पडल्याने त्यांचे संसारोपयोगी वस्तू दाबल्या गेल्या. बहूतांशी ठिकाणी विजेचे खांब कोसळून व तारा तुटून पडल्याने रात्रभर गावे अंधारात होती बºहाणपूर- अंकलेश्वर राज्य महामार्गावर चोरवड येथील मध्य प्रदेशातील सीमा ते बºहाणपूर दरम्यान ३० ते ३५ झाडे उन्मळून पडल्याने तब्बल ४ तास १३ किलोमीटर अंतरापर्यंत दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, गुरूवारी दुपारपर्यंत महसूल व कृषी प्रशासनाने २५ गावात वादळी पाऊस व गारपिटीने बुधवारी दिलेल्या तडाख्यात ९८२ शेतकºयांचे ११३७ हेक्टरमधील केळी मातीमोल झाल्याने ७५.७९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.