जळगावात गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागणार 75 रुपये जादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 07:23 PM2017-09-02T19:23:28+5:302017-09-02T19:26:59+5:30
घरगुती सिलिंडर 605 रुपयाला : एकूण हिशेबात 9 रुपयांचा बसणार भरूदड
ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल
जळगाव, दि. 2 - दरमहा अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती वाढविण्याच्या निर्णयांतर्गत सरकारने सिलिंडरच्या किंमतीत सात रुपयांची वाढ केली असली तरी जळगावकरांना प्रत्यक्षात आता 75 रुपये जादा मोजावे लागणार आहे.
530 वरून 605 वर किंमत
दरवाढ होण्यापूर्वी जळगावात घरगुती सिलिंडरची (14 किलो) मूळ किंमत 488.16 रुपये होती ती आता 495.16 रुपये झाली आहे. मात्र सिलिंडर घेताना अनुदानासहीत रक्कम एजन्सीला द्यावी लागते. त्यामुळे पूर्वी ग्राहकांना 530.50 द्यावे लागत होते आता हे दर 605 रुपये झाले आहे.
पाच टक्के जीएसटी
आता सिलिंडर घरी आल्यानंतर त्याचे बिल 576.20 रुपये असेल त्यावर केंद्राचा वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) अडीच टक्के (14.40 रुपये) व राज्याचा वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) अडीच टक्के (14.40) मिळून हे सिलिंडर 605 रुपयांवर जाणार आहे. यामधून 109.84 रुपये अनुदान ग्राहकाच्या खात्यात जमा होईल.
सात रुपयांच्या वाढीसह नऊ रुपयांचा अतिरिक्त भरूदड
75 रुपये जादा मोजल्यानंतर अनुदान तर खात्यात जमा होईल, मात्र ग्राहकांना यात सात रुपयांच्या वाढीसह नऊ रुपयांचा अतिरिक्त भरूदड एका सिलिंडरमागे सहन करावा लागणार आहे. कारण पूर्वी 43 रुपये अनुदान ग्राहकाच्या खात्यात जमा होत असे. आता 109.84 रुपये खात्यात जमा होतील. अर्थात पूर्वीपेक्षा 66.84 पैसे जादा जमा होतील, मात्र सिलिंडर घेताना तर 75 रुपये जादा दिलेले असतात. त्यामुळे एकूण किंमतीवर लागलेला कर जमा न होता नऊ रुपयांचा जादा भरूदड ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
गॅस सिलिंडरच्या मूळ किंमतीत सात रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी 530.50 रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत होते आता त्याची किंमत 605 रुपये झाली आहे. यामधून 109.84 रुपये अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा होईल.
- अजय ठोंबरे, व्यवस्थापक गॅस एजन्सी.