राज्यात ७५० महाविद्यालये, पण बहुमान जळगावला!
By अमित महाबळ | Published: October 11, 2023 06:05 PM2023-10-11T18:05:06+5:302023-10-11T18:05:26+5:30
शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्पर्धेचे आयोजन आहे.
जळगाव : महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न महाविद्यालयांची राज्यस्तरीय आंतरविभागीय निवड चाचणी स्पर्धा दि. १३ व १४ रोजी, जळगावला होत आहे. शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्पर्धेचे आयोजन आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा होतील. यामध्ये कबड्डी, खो-खो, बास्केट बॉल, व्हॉलिबॉल व ॲथलेटिक्सचा समावेश आहे. निवड चाचणीतून प्रत्येक खेळासाठी विद्यापीठ संघ निवडला जाणार आहे. राज्यातील महाविद्यालयांचे ९०० खेळाडू, संघ प्रबंधक व समन्वयक मिळून एक हजार जण जळगावमध्ये येणार आहेत. आयोजनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. अभिजित अहिरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शासकीय होमिओपॅथिक व शासकीय आयुर्वेदिक कॉलेजचे शिक्षक व कर्मचारी यांच्या १७ समिती गठीत करण्यात आल्या आहेत. सहसमन्वयक चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रा. एस. बी. चौधरी आहेत.
निवास व्यवस्था मुलांची खासगी मंगल कार्यालयात, तर मुलींची जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आली आहे. गुरुवारी, सकाळी ९ वाजेपासून संघांचे आगमन होईल. उद्घाटन दि. १३ रोजी, सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दि. १४ रोजी, दुपारी २ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मिलिंद निकुंभ यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी खेळाडूंचा कौतुक सोहळा होईल. समारोप रात्री ८ वाजता आहे.
खान्देशी पदार्थ राज्यात पोहोचणार
स्पर्धेच्या निमित्ताने खान्देशी खाद्यसंस्कृतीची ओळख राज्यात पोहोचवली जाणार आहे. त्यासाठी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या जेवणात शेवभाजी, भरीत, ठेचा-भाकरी, डाळ-गंडोरी आदी पदार्थांचा समावेश असणार आहे.
७५० कॉलेजमधून जळगावला संधी
राज्यात मेडिकल व पॅरामेडिकलची ७५० महाविद्यालये आहेत. यातून स्पर्धा आयोजनाचा मान जळगावचे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाला मिळाला आहे. यामुळे जळगावच्या मेडिकल हबची संकल्पना राज्यात पोहोचण्यास मदत होणार आहे, असे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा समन्वयक डॉ. रितेश पाटील यांनी म्हटले आहे.