खान्देशातील ७८ हजार शेतकऱ्यांनी घेतला ` महाकृषी उर्जा `अभियानाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:42+5:302021-06-30T04:11:42+5:30
जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा ...
जळगाव : वर्षानुवर्ष कृषी पंपाची विजबील थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे यंदापासून `महाकृषी ऊर्जा `अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाचा खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे.
कोरोनामुळे महावितरणतर्फे गेल्या वर्षी मार्च ते जून दरम्यान शासनाच्या सुचनेनुसार सर्व प्रकारच्या ग्राहकांना घरोघरी जाऊन रिडींग न घेता, सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, सरासरी वीज बील हे अवाजवी असल्याचे सांगत, सर्व प्रकारच्या ग्राहकांनी हे विजबिल भरण्याला विरोध केला होता. यामध्ये आधीच वर्षानुवर्ष थकबाकी असलेल्या शेतकरी बांधवांनी तर हे वीजबिल भरण्याला तीव्र विरोध केला होता. मागील थकबाकी व चालु विजबिल मिळून, अनेक शेतकरी बांधवाना लाखोंच्या विजबिल आले होते. त्यामुळे महावितरणने कृषी पंपाचे वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदापासून `महाकृषी ऊर्जा` अभियान सुरू केले आहे. या योजने अंतर्गंत पहिल्या वर्षी थकीत वीज बिल भरणाऱ्या शेतकरी बांधवांना वीज बिलात ६६ टक्क्यांपर्यंत सुट देण्यात येत आहे. त्यानुसार खान्देशातील जून अखेर ७८ हजार शेतकऱ्यांनी थकीत विजबिलावर सवलत घेऊन, या अभियानाचा लाभ घेतला आहे.
इन्फो :
काय आहे `महाकृषी उर्जा `अभियान
राज्याच्या उर्जा मंत्रालयातर्फे गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून या अभियानाला सुरूवात करण्यात आली असून, सलग तीन वर्ष हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानानुसार पहिल्या वर्षी विज बिलाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, यात व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या थकबाकी मध्ये एकूण ६६ टक्के सवलत मिळणार आहे. तसेच अभियानाच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढील वर्षी थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याला विजबिलावर ३० टक्के सवलत मिळणार असून, तिसऱ्या वर्षी या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला २० टक्केच सवलत मिळणार आहे.
या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे.
इन्फो :
सर्वाधिक लाभार्थी जळगाव जिल्ह्यातील
या अभियानाचा आतापर्यंत खान्देशातील ७८ हजार १०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, यात जळगाव जिल्ह्यातील ४१ हजार ३४० शेतकरी बांधवांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी सवलतीचा लाभ घेऊन, ५४ कोटी ३८ लाखांचा विजबिल भरणा केला आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार ९७७ शेतकऱ्यांनी २१ कोटी १४ लाखांचे बिल भरले आहे. तर धुळे जिल्ह्यातील २१ हजार ८७३ शेतकऱ्यांनी १४ कोटी ४८ लाख इतके थकीत विजबिल भरले आहे.