‘रेमंड’मधील अपहारप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: February 14, 2017 01:10 AM2017-02-14T01:10:30+5:302017-02-14T01:10:30+5:30
फसवणूक : पोलिसांनी मागविले 12 वर्षाचे रेकॉर्ड
जळगाव : खोटे दस्ताऐवज तयार करुन कामगार हिताच्या 78 लाख रुपयांचा वेळोवेळी गैरवापर व अपहार केल्याप्रकरणी रेमंड कंपनीतील कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व संचालक मंडळाविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार, गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अध्यक्ष दिलीप उखा महाजन (वय 46 रा.आसोदा, ता.जळगाव), उपाध्यक्ष दिवाकर कडू चौधरी (वय 45, रा.तिवारी नगर, जळगाव), सेक्रेटरी तुषार किरण राणे (वय 32 रा.सालबर्डी, पो.कोथळी, ता.मुक्ताईनगर), सुनील डिगंबर फालक (वय 52 रा.लक्ष्मी नगर, जळगाव), अनिल विष्णू पाटील (वय 45 रा.आयोध्या नगर, जळगाव), नवल पौलाद पाटील (वय 44 रा.सावित्री नगर, जळगाव), दिलीप काशिनाथ वराडे (वय 33 रा.काहूरखेडा, ता.भुसावळ) व किरण चिंतामण भारंबे (वय 45 रा.श्रध्दा कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे. या सर्वाविरुध्द 156 (3) प्रमाणे कलम 420, 465, 468, 471, 120 (ब) 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने 8 फेब्रुवारी रोजी दिले आहेत.
या गुन्ह्याचे तपासाधिकारी सहायक निरीक्षक समाधान पाटील यांनी 2004 ते 2016 या 12 वर्षातील व्यवहाराचे सर्व कागदपत्रे संस्थेकडून मागविले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कधीपासून केली जात होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आज पंचनामाही केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.