२१ केंद्रांवर कुठे ८ तर कुठे ९ जण घेताय दिवसभरात लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:54+5:302021-02-24T04:17:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस आणि त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सक्त सूचना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस आणि त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सक्त सूचना असतानाही काही केंद्रांवर लसीकरण हव्या त्या प्रमाणात होत नसल्याचे चित्र आहे. यात काही केंद्र तर अगदीच संथ सुरू असून पूर्ण दिवसभर कुठे ९ तर कुठे ८ जण लस घेत आहेत. शहरातील डीबी जैन या केंद्रावर तर सोमवारी एकाही कर्मचाऱ्याने लस घेतली नाही. मोजक्याच केंद्रावर काही प्रमाणात गर्दी होत आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी २१ केंद्र आहेत. त्यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावातील खासगी रुग्णालय, पाचारो, धरणगाव, भुसावळ आदी केंद्रांवर अधिक लसीकरण होत असल्याचे चित्र आहे. दुपारच्या सुमारास केंद्र ओस पडत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तालुक्यातील आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणही होत आहे. महसूल कर्मचाऱ्यांचा दुसरा टप्पा सुरू झाला त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र होते.
कुठे ८३ टक्के कुठे ४९ टक्के
जिल्ह्यात २० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे. यासह महसूल व पोलीस प्रशासन असे मिळून सहा हजारांवर कर्मचारी आहेत. एकूण २६ ते २७ हजार कर्मचाऱ्यांपैकी पहिला व दुसरा टप्पा पकडून एकत्रित ७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला टप्पा अद्याप पूर्ण करण्यात प्रशासनाला अडचणी येत असल्याचे चित्र आहे. यात बोदवड केंद्रावर सर्वाधिक ८३.८ टक्के लसीकरण झाले असून सर्वात कमी जळगाव ग्रामीणमध्ये ४९.४ टक्के झाले आहे.
लस घेतल्यानंतर...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लस घेतल्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांनी, डॉक्टरांनी निरीक्षण कक्षात अर्धा तास थांबून लसीकरणाचा नियम पाळला. मात्र, बऱ्याच वेळा डॉक्टर कुठे बाहेर गेल्यानंतर लस घेतलेले कर्मचारी पंधरा मिनिटातच केंद्र सोडत असल्याचे गंभीर चित्रही काही केंद्रांवर समोर आले आहे. किमान अर्धा तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणे बंधनकारक आहे.
जास्तीत जास्त केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा पहिला डोस हा ८० टक्क्यांपर्यंत झालेला आहे. काही कर्मचाऱ्यांना काही आजार असणे, थोडी भीती असणे याबाबी आहेत. प्रशासकीय यंत्रणा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व केंद्रावर सर्व नियमांचे पालन होत असून त्यावर अधिकाऱ्यांचे निरीक्षण असते. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्ह्यातील लसीकरण केंद्र आणि लसीकरण
जीएमसी : ३६
जामनेर : ४८
चोपडा : ३३
मुक्ताईनगर : १८
चाळीसगाव : ५४
पारोळा : ५६
भुसावळ : ४१
अमळनेर : ४०
पाचोरा : ८९
रावेर : ३२
यावल : ७१
गाजरे हॉस्पिटल : ४४
गोल्डसीटी हॉस्पिटल : ५३
भडगाव : ९
बोदवड : ८
एरंडोल : ५७
भुसावळ : १३
ऑर्किड हॉस्पिटल : २४
धरणगाव : ८०
डीबी जैन रुग्णालय : ०
भुसावळ : ४