दरमहा 8 लाख 50 हजार लिटर केरोसिनची होणार बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 08:21 PM2018-11-14T20:21:10+5:302018-11-14T20:21:13+5:30
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव शहर व ग्रामीण भागात केरोसिन वितरण पूर्णत: बंद करण्यात आले
जळगाव :- जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव शहर व ग्रामीण भागात केरोसिन वितरण पूर्णत: बंद करण्यात आले असून संपूर्ण जळगाव जिल्हा केरोसिनमुक्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
जिल्ह्यात दरमहा 8 लाख 50 हजार केरोसिनची मागणी होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही मागणी शून्यावर आली असून यामुळे दरमहा 8 लाख 50 हजार केरोसिनची बचत होणार आहे. जाधव पुढे म्हणाले की, जिल्ह्यात ई- पॉस मशिनद्वारे धान्य वितरण केले जात असून याचे प्रमाण 81 टक्के आहे. तर जिल्ह्यातील 90.43 टक्के शिधापत्रिकांचे आधार सिडींग झालेले आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत आदिवासीबहुल क्षेत्रातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.
जिल्ह्यात 1 मे 2018 पासून एईपीडीएस वितरण पद्धत लागू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एकूण 1921 स्वस्त धान्य दुकाने असून त्यापैकी महिला बचत गटांची 96, अनुसूचित जाती घटकांची 129, अनुसूचित जमाती घटकांची 60 तर माजी सैनिकांची 4 व ग्रामपंचायतीचे 1 आहेत. यांच्यामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था योजना राबविण्यात येत असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.