विद्युत मीटर ठेक्याच्या नावाने ८ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:33 PM2019-04-30T14:33:50+5:302019-04-30T14:36:19+5:30
अमळनेर : नाशिकच्या ठेकेदाराविरूद्ध गुन्हा
अमळनेर : स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याचा पोट ठेकेदार नेमण्यासाठी अमळनेर येथील एकाची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात नाशिकच्या ठेकेदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष रमेश पाटील (रा.अमळनेर) याने चोपडा शहर व चोपडा ग्रामीण उत्तर महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याचा कंत्राट मिळण्यासाठी शरद त्र्यंबक पाटील (रा.मोंढाले पिंपरी ह मु नाशिक) यांना डेलिकसी रिक्रीशन रिस्ट्रक्चर प्रा लि. आणि पॅराडाईज प्रा.लि. या कंपनीच्या त्यांना मिळालेल्या टेंडर मधून काम मिळण्यासाठी एक लाख रुपये दिले. फर्मचे मालक यांनी एक लाख रुपये मिळाल्याचे लेटर पॅड वर लिहून दिले आणि उत्तर महाराष्ट्राचे काम देण्याचेही पत्र दिले. त्यानंतर त्यांनी हे काम देण्यासाठी आठ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर ही रक्कम देण्यात आली. मात्र शरद पाटील यांनी आतापर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याचा उत्तर महाराष्ट्राचा ठेका न दिल्याने त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला धाव घेतली. या प्रकरणी संतोष शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून शरद पाटील याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हवालदार पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.
वेळोवेळी दिली आठ लाखांची रक्कम
त्यानुसार १४ जून २०१८ रोजी दोन लाख, २७ जून रोजी एक लाख, २४ मे रोजी दीड लाख रुपये बँकेत दुसऱ्याच्या बँक खात्यातून दिले. तसेच १९ जुलै रोजी स्वत:च्या बँक खात्यातून १ लाख रुपये असे एकूण आठ लाख रुपये दिले. या दरम्यान रक्कम देतेवेळी राकेश केवलसिंग जाधव (रा.धुळे) हे साक्षीदार होते.