उपमहापौरांच्या जनता दरबारात ८० टक्के रस्त्यांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:38+5:302021-01-22T04:15:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाचे उपमहापौर सुनील खडके यांनी गुरुवारपासून ‘जनता दरबार’ सुरु केला. पहिल्याच दिवशी शहरातील १५० ...

80% road problem in Deputy Mayor's Janata Darbar | उपमहापौरांच्या जनता दरबारात ८० टक्के रस्त्यांची समस्या

उपमहापौरांच्या जनता दरबारात ८० टक्के रस्त्यांची समस्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाचे उपमहापौर सुनील खडके यांनी गुरुवारपासून ‘जनता दरबार’ सुरु केला. पहिल्याच दिवशी शहरातील १५० हून नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी उपमहापौरांसमोर मांडल्या. यामध्ये ८० टक्के नागरिकांनी शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त केली असून, खराब रस्त्यांवर काहीतरी तोडगा लवकर काढा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. उपमहापौरांकडे नागरिकांनी रस्त्यांच्या समस्येसह अस्वच्छता, अतिक्रमण व पेन्शनच्या समस्यांचा पाढा देखील मांडला.

मनपाच्या आवारात प्रथमच अशा प्रकारचा जनता दरबार भरवण्यात आला. यावेळी उपमहापौरांसह महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, ॲड शुचिता हाडा, अमित काळे, चेतन सनकत, गायत्री राणे, मनोज आहुजा, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे,ॲड. दिलीप पोकळे याच्यांसह मनपातील सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

रस्ते असे की पायी चालणेही कठीण

शिवकॉलनी भागातील काही महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. अमृत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली असून, खोदकाम झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने काही महिलांनी रस्त्यांचा प्रश्नावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. रस्त्यांची समस्या भयंकर असून, संपुर्ण शहरात पायी चालणेही कठीण झाले असून, रस्त्यांचे काहीतरी करा अशी मागणी महिलांनी केली. शिवाजीनगर भागातील नागरिकांनी देखील रस्त्यांच्या प्रश्नावरच आपल्या अडचणी मांडल्या. मनपा प्रशासनाने दुसरे कामे सोडून आधी रस्त्यांचा विषय मार्गी लावावा अशाही व्यथा नागरिकांनी मांडल्या. उपमहापौरांनी अडचणी ऐकून घेवून सर्व तक्रारी संबधित विभागप्रमुखांकडे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच नवीन रस्त्यांचे काम होईपर्यंत दुरुस्ती करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा

महापालिकेत ३० ते ३५ वर्ष सेवा केल्यानंतरही मनपा प्रशासनाने अजूनही अनेकांना पेन्शन लागू केलेली नाही. पेन्शनसाठी दररोज मनपात हेलपाटे खावे लागत असून, मनपाने आता तरी आमचा विचार करावा अशी मागणी परवेज खान आमीरखान पठाण यांनी केली. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करावा असा ठराव १५ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेने केला होता. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याची माहिती पठाण यांनी दिली.

या विषयांवर मांडल्या समस्या

अमृत योजना – भुयारी गटारी यांमुळे नादुरुस्त झालेले रस्ते, अस्वच्छता, स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री पसरणारे अंधाराचे साम्राज्य, अव्यवस्थित ओपन स्पेस, डासांचा उपद्रव, खड्डयामुळे वाहन चालवितांना होणारे हाल, खड्डे न बुजल्याने घडणारे किरकोळ अपघात, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे आदींबाबत नागरीकांनी जनता दरबारात गाऱ्हाणी मांडली. जनता दरबारात सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित असल्याने किरकोळ तक्रारींबाबत जागीच कार्यवाही योजण्यात आली. या व्यतिरिक्त अनेकांनी लेखी स्वरुपातही तक्रारी दाखल केल्या.

Web Title: 80% road problem in Deputy Mayor's Janata Darbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.