८० वर्षांच्या वृद्धेनं जिंकला 'श्रीमंत' लेकरांविरुद्धचा लढा; चौघांनाही करावा लागणार जन्मदात्रीचा सांभाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 03:24 PM2023-04-13T15:24:15+5:302023-04-13T15:25:42+5:30

शेवटी प्रशासनाने लेकरांना कायद्याच्या चौकटी उभं केलं आणि वृद्ध मातेच्या सांभाळ करण्यासाठी महिनावर जबाबदारी निश्चीत करुन मातेला हक्काचं घर मिळवून दिलं.

80-Year-Old Wins Fight Against 'Rich' Sons; All four will have to take care of Mother in Jalgaon ! | ८० वर्षांच्या वृद्धेनं जिंकला 'श्रीमंत' लेकरांविरुद्धचा लढा; चौघांनाही करावा लागणार जन्मदात्रीचा सांभाळ!

८० वर्षांच्या वृद्धेनं जिंकला 'श्रीमंत' लेकरांविरुद्धचा लढा; चौघांनाही करावा लागणार जन्मदात्रीचा सांभाळ!

googlenewsNext

- कुंदन पाटील

जळगाव : वारसा हक्काने मालमत्तेसह दागिन्यांची वाटणी झाली. तेव्हा लेकरांना ‘श्रीमंती’ पावली. कालांतराने समाजात ‘उच्चभ्रू’चा मुखवटा मिरवणाऱ्या या लेकरांनी ८० वर्षीय मातेचा सांभाळ करण्यासाठी पाठ दाखविली. तेव्हा नाईलाजास्तव मातेलाही लेकीचा दरवाजा ठोठवावा लागला. जावयानेही मोठ्या मनाने सासूला आधार दिला. मात्र मामांच्या शकुनीगिरीला धडा शिकविण्यासाठी नातवाने आजीचा हात धरला आणि तिला प्रशासनाच्या दारात उभं केलं. तेव्हा ८० वर्षीय मातेच्या वेदना ऐकून प्रशासनही पाझरत गेलं. शेवटी प्रशासनाने लेकरांना कायद्याच्या चौकटी उभं केलं आणि वृद्ध मातेच्या सांभाळ करण्यासाठी महिनावर जबाबदारी निश्चीत करुन मातेला हक्काचं घर मिळवून दिलं.

सदमाबाईचा (सर्व नाव बदललेले) हा वेदनादायी आयुष्य प्रवास. तशी ती वयाने ऐंशीच्या घरात. तीन मुले आणि एक मुलींची ती ‘माय’. पती हयात असताना लेकरांना मालमत्तेची वाटणी झाली.दागिन्यांचाही हिशेब मोकळा झाला आणि लेकरांनी मातेला पाठ दाखवायला सुरुवात केली. एक मुलगा आजारग्रस्त असल्याने दोन्ही मुलांकडे मातेने आसरा मागितला. मात्र मातेच्या विनंतीला दोघांनी धुडकावून लावले. तेव्हा वृद्धेला जळगावात वास्तव्यास असणारी कन्या शीलाने आसरा दिला. जावई सुभाष यांनी धीर दिला. हा प्रवास सुरु असतानाच एरंडोलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दोन्ही लेकरांना मातेचा विसर पडत गेला. 

तेव्हा पोटच्या गोळ्यांसाठी ओझं बनलेल्या मातेलाही दु:ख बोचत गेलं. तिने नातवाचा हात धरला आणि जळगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. तिथले उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर यांनी मातेच्या वेदना ऐकल्या. तेही अस्वस्थ झाले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायद्यानुसार तक्रार अर्ज स्वीकारला आणि सुनावणी सुरु केली. सुधळकर यांनी दोन्ही लेकरांना खूपदा समजावून पाहिले. मात्र काहीएक फायदा झाला नाही. शेवटी त्यांनी मंगळवारी रात्री या नाजूकशा निवाड्यावर सुनावणी केली आणि तीनही मुलांसह लेकींवर मातेच्या निर्वाहाची महिनावार जबाबदारी सोपविली.त्यानुसार पोलीस प्रशासनाने मातेच्या निर्वाहासंदर्भात कारवाईचे आदेशही दिले.

मातेच्या निर्वाहासाठी सोपविलेली जबाबदारी
नाव                   कालवधी-                 
आकाश-            एप्रिल-सप्टेंबर           
निनाद-              ऑक्टोबर-नोव्हेंबर        
आतीश-             डिसेंबर-जानेवारी
शीला-                फेब्रुवारी मार्च      

तक्रार अतिशय नाजूक होती.खूपदा तोडगा काढण्यासाठी ‘माणूस’ म्हणून वेळही दिला. मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार चौघांवर मातेच्या निर्वाहाची जबाबदारी निश्चीत केली आहे. त्याची दखल न घेतल्यास कायदेशीर कारवाई करु. 
- महेश सुधळकर, उपजिल्हाधिकारी, जळगाव.
 

Web Title: 80-Year-Old Wins Fight Against 'Rich' Sons; All four will have to take care of Mother in Jalgaon !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव