घटस्थापनेच्या दिवशी जळगावात ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकी येणार रस्त्यावर

By विलास बारी | Published: October 14, 2023 08:50 PM2023-10-14T20:50:26+5:302023-10-14T20:50:56+5:30

सोने-चांदीसह घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची होणार मोठी खरेदी

800 two-wheelers and 300 four-wheelers will be on the road in Jalgaon on the day of Ghattashapana | घटस्थापनेच्या दिवशी जळगावात ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकी येणार रस्त्यावर

घटस्थापनेच्या दिवशी जळगावात ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकी येणार रस्त्यावर

विलास बारी, जळगाव: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून, बाजारात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचे मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले आहे. तसेच सोने-चांदी खरेदीकडेही ग्राहकांचा कल वाढत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकींची विक्री होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही यावेळी एलईडी, वॉशिंग मशीन, एसीला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.

साडेतीन मुहूर्तांसह अनेकजण घटस्थापनेलाही विविध वस्तू खरेदी करतात. त्यानुसार अनेकांनी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बुकिंग केले आहे. मनाजोगे वाहन व वस्तू मिळाव्या म्हणून मोठ्या प्रमाणात बुकिंग केले असून, घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध कंपन्यांकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. अर्थसाहाय्य तसेच भेटवस्तू देण्यासह एक्स्चेंज ऑफरही असल्याने याचाही ग्राहक मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत.

चारचाकींना वाढली मागणी

चारचाकींच्या बाजारात मोठा उत्साह दिसून येत असून, नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच किमान ३०० चारचाकी रस्त्यावर येण्याचा अंदाज आहे. शहरातील एकाच शोरूमध्ये ५५० चारचाकींचे बुकिंग झाले आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या ठिकाणाहून ११० चारचाकींची डिलिव्हरी दिली जाणार आहे. इतर शोरूमचे मिळून एकूण एक हजार ५०० चारचाकींचे बुकिंग आहे. मात्र, अनेक गाड्या उपलब्ध नसल्याने किमान ३०० गाड्यांची डिलिव्हरी होणे अपेक्षित आहे.

८०० दुचाकींची विक्री होणार

दुचाकीच्या एकाच शोरूमध्ये १७५ दुचाकींचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले. इतर सर्व शोरूमचे मिळून किमान ८०० दुचाकींची विक्री होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यामध्ये मोपेड गाड्यांना अधिक पसंती असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारही गजबजला

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजार गजबजला आहे. एलईडी, वॉशिंग मशीन, एसीला अधिक पसंती दिसून येत आहे. त्याखालोखाल ओव्हन व अन्य होम अप्लायन्सेसला मागणी आहे. या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे.

सुवर्ण खरेदीला झळाळी

पितृपक्ष संपताच घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होणार असून, चांदीचे पूजा साहित्य, लहान मूर्ती, मुकुट, छत्र, सिंहासन यांना मागणी असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. सध्या सोने-चांदीचे भाव वाढले असले तरी मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदीचा अंदाज वर्तविला जात आहे.

स्वप्नातील घर होणार साकार

घटस्थापनेच्या मुहूर्तावर अनेकजण गृहप्रवेश करणार असून, अनेकजण या मुहूर्तावर बुकिंग करणार आहेत. नवरात्रोत्सवात किमान १५० ते २०० घरांची विक्री होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून घरांच्या खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यामुळे घरांना मागणी वाढली असून, या क्षेत्रात यंदा उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवात घरांची विक्री होण्यासह बुकिंग होऊ शकते.
- सपन झुनझुनवाला, बांधकाम व्यावसायिक.

दुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून, आमच्याकडे २०० दुचाकींची डिलिव्हरी होणे अपेक्षित आहे. अनेक मॉडेल उपलब्ध असून, पसंतीनुसार ग्राहकांना त्वरित वाहने मिळणे शक्य होणार आहे.
- अमित तिवारी, दुचाकी वाहन व्यावसायिक.

Web Title: 800 two-wheelers and 300 four-wheelers will be on the road in Jalgaon on the day of Ghattashapana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.