मुदत संपूनही ८० हजार लोकांनी घेतला नाही दुसरा डोस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:12+5:302021-09-02T04:33:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडपासून सुरक्षा म्हणून लसीकरण करून घेणे अत्यावश्यक असल्याचे जिल्ह्यातील तज्ज्ञही सांगत आहेत. जिल्ह्यात लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडपासून सुरक्षा म्हणून लसीकरण करून घेणे अत्यावश्यक असल्याचे जिल्ह्यातील तज्ज्ञही सांगत आहेत. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला आता मोठी गती आली आहे; मात्र अद्यापही ८१५१७ लोकांनी पहिल्या डोसनंतर मुदत संपूनही दुसरा डोस घेतलेला नसल्याची माहिती आहे. मध्यंतरी लसींअभावी अनेकांना दुसरा डोस मिळत नव्हता. अखेर हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता मोठ्या केंद्रांवर केवळ दुसरा डोसच दिला जात आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात दोनवेळा लसीकरणाचा एका दिवसातील विक्रम नोंदविण्यात आला आहे. यात जळगाव शहरातील दुसरा डोस प्रलंबित असल्याचा पूर्ण बॅकलॉक भरून निघाला आहे. २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १ लाख ७१ हजारांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. गेल्या ८ महिन्यातील हा उच्चांक आहे. शिवाय जिल्ह्यात गेल्या ५० दिवसांपासून कोविडमुळे एकही मृत्यू झालेला नसून संसर्गाचे प्रमाणही घटले आहे. हा लसीकरणाचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दुसरा डोस पूर्ण करून घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दुसऱ्या डोससाठीची मुदत
कोविशिल्ड ८४ दिवस
कोव्हॅक्सिन २८दिवस
जिल्ह्यात झालेले लसीकरण (ग्राफ)
पहिला डोस -
९६७४१५
दुसरा डोस -
३६१८०६
दुसरा डोसही तितकाच आवश्यक
पहिला डोस घेतल्यानंतर मुदतीत दुसरा डोस घेणे अत्यावश्यक असते. दुसरा डोस घेतल्यानंतर पुढील सहा ते सात महिने कोविडशी लढणाऱ्या अँटिबॉडीज शरीरात कार्यरत असतात. केवळ पहिला डोस यासाठी पुरेसा नसल्याचे अभ्यासक सांगतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
नियोजन काय
पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांचा दुसरा डोस लसींअभावी पेंडिंग राहत असल्याचे मध्यंतरी चित्र होते; मात्र आता आलेल्या डोसमध्ये प्राधान्याने दुसरा डोस पूर्ण करण्यात येत आहे. केवळ छोट्या गावांमध्येच पहिला डोस दिला जात असून मोठ्या शहरांमध्ये दुसरा डोस पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाते. त्या पार्श्वभूमीवर शहरातील कोविशिल्ड लसींच्या डोसमध्ये केवळ दुसराच डोस दिला जात आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणे आवश्यक असते. कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर ८४ दिवसांनी मुदतीच्या आत दुसरा डोस पूर्ण करून घ्यावा. याने पुढील सहा ते सात महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडीज कार्यरत राहतात. कोविडपासून सुरक्षा म्हणून दुसरा डोस पूर्ण करून घ्यावा. - डॉ. समाधान वाघ, लसीकरण अधिकारी